देवळा :- तालुक्यातील लोहोणेर येथे प्रेमप्रकरणावरून युवकाला बेदम मारहाण करून त्याला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात युवक ५५ टक्के भाजला त्याला पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून, देवळा पोलिसांत या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, आज (दि.११) सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास लोहोणेर ता. देवळा येथे प्रेम प्रकरणावरून गोरख काशिनाथ बच्छाव (वय ३१) या युवकाला रावळगाव सेक्शन ता. मालेगांव येथील मुलीच्या घरच्यांनी बेदम मारहाण करून त्याचावर पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रकार घडला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व भाजलेल्या अवस्थेतील युवकाला पोलिसांनी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात तो ५५ टक्के भाजल्याची माहिती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश कांबळे यांनी दिली. रावळगाव ता. मालेगांव येथील एका मुलीशी लोहोणेर ता. देवळा येथील युवक गोरख काशिनाथ बच्छाव याची गेल्या तीन वर्षांपूर्वी ओळख झाली. त्याने या मुलीकडे लग्नाची मागणी केली होती.
लग्न कर अन्यथा तुझ्या घरच्यांना मारून टाकेन अशी धमकी दिली होती. या प्रकारमुळे मुलीचे इतर ठिकाणी लग्न जमत नसल्याचा संताप मुलीच्या वडिलांना आला. या रागाच्या भरात आज मुलीच्या वडिलांनी व इतर घरातील सदस्यांनी लोहोणेर येथे येऊन गोरख बच्छाव या तरुणाचा शोध घेऊन त्याला बेदम मारहाण करून त्याच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने लोहोणेर सह संपूर्ण देवळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देवळा पोलिसांनी चौकशीकामी कल्याणी गोकुळ सोनवणे (वय २३), गोकुळ तोंगळ सोनवणे (वय ५७), निर्मला गोकुळ सोनवणे (वय ५२), हेमंत गोकुळ सोनवणे (वय ३०), प्रसाद गोकुळ सोनवणे (वय १८) सर्व रा. रावळगाव सेक्शन, ता. मालेगाव या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्ष दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.