देवळा :- नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी नंतर येथील नगराध्यक्ष होण्याचा बहुमान भाजपच्या उमेदवार सौ. भारती अशोक आहेर यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेमध्ये अर्ज दाखल करण्याची आज (दि. ८) रोजी अंतिम मुदत होती. या मुदतीमध्ये सौ. भारती आहेर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्षपद निवडणुकीची आता फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. सौ. आहेर या भाजपच्या उमेदवार असून माजी सरपंच, बाजार समितीचे माजी सभापती, पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच माजी उपनगराध्यक्ष, शारदा देवी ज्ञान विकास मंदिर संस्थापक अध्यक्ष अशोक आहेर यांच्या पत्नी आहेत.

देवळा नगरपंचायत मध्ये 17 पैकी 15 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. यापैकी आठ महिला नगरसेवक विजयी झालेल्या आहेत. देवळा नगरपंचायतीचे अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव झाल्याने नगराध्यक्ष होण्यासाठी मोठी चुरस निर्माण झालेली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी काल नगरसेवकांची बैठक घेऊन नगराध्यक्ष पदासाठी सन्माननीय तोडगा काढून जि. प. च्या माजी सदस्या सौ. भारती आहेर यांना प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान दिला आहे. याची १५ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी फक्त औपचारिकता बाकी आहे. सौ. आहेर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून संजय आहेर व अनुमोदक म्हणून अशोक संतोष आहेर यांनी स्वाक्षरी केली आहे.
सत्ता वाटपावरून काहीकाळ रस्सीखेच झाली. मात्र चर्चेअंती जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी सुचवलेला तोडगा सर्वानुमते मान्य करण्यात आला. त्यानुसार नगराध्यक्षपदाचे महिलांसाठीचे आरक्षण हे अडीच वर्षे कायम राहणार असल्याने विजयी महिला उमेदवारांपैकी तीन महिला उमेदवारांना प्रत्येकी दहा महिन्यांचा कार्यकाळ रोटेशन पद्धतीने देण्याचे निश्चित करण्यात आले, तर उपनगराध्यक्ष म्हणून माजी गटनेते जितेंद्र आहेर यांना देखील प्रथम संधी देऊन याचे रोटेशन आखण्यात आले आहे.