देवळाली कॅम्प :- स्वच्छ देवळाली व सुंदर देवळालीच वसा जोपासणाऱ्या देवळालीत कॅन्टोन्मेंट बोर्डाने वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घेत सामाजिक वनीकरण उपक्रमात सहभाग नोंदविल्यानंतर आता मृदा संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी ‘माती वाचवा ‘ व ‘ सेंद्रिय शेतीकडे वळा ‘ हा संदेश देण्यासाठी येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, वाचनालय,बस स्थानक व जॉगिंग ट्रॅकवरील भिंतीवर विविध रंगानी झाडे व पृथ्वीचे संरक्षण करण्याचे विविध चित्रे रेखाटली आहे.
कोईम्बतूरस्थित ईशा फाऊंडेशनच्या नाशिक येथील सदस्य व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संयुक्त विद्यमाने हा ‘ माती वाचवा ‘चा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी भितींवर पर्यावरण पूरक संदेश रेखाटले आहे. सदगुरु जग्गी वासुदेव यांनी ‘ रॅली फॉर रिवर ‘व ‘ कावेरी कॉलिंग’ या अभियानादरम्यान २१ मार्च २०२२ पासून लंडन येथूनव एकल बाईक राईड करत तब्बल २७ हून अधिक राष्ट्रांच्या प्रमुखांना भेटत त्या-त्या राष्ट्राच्या अनुषंगाने माती संरक्षणाची महत्वपूर्ण धोरणे देत आहेत. याद्वारे पृथ्वीवरील मृत्तिकेच्या जैविक सत्वाचे प्रमाण हे आदर्शानुसार ३-६% असून सध्या ०.५% हून कमी आहे. यामुळे लवकरच अन्नाचे उत्पादन हे कमी होऊन दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होणार आहे.

याकरिता तात्काळ निदान हे राष्ट्रांतील धोरणांमध्ये माती संवर्धनाचे महत्व असणे गरजेचे आहे असे सद्गुरूंचे विचार असून याकामी भिंतीचित्र हे लक्षवेधी माध्यम आहे. त्यामुळे या माध्यमाचा वापर करून जनजागृती करायचा नाशिक येथील पृथ्वी मित्र व ‘ईशा’च्या कार्यकर्त्यांनी रविवारी यशस्वी प्रयत्न केला. या कार्यात परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. राहूल गजभिये, व आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
गेली दोन दिवस देवळालीतील दर्शनीय भितींवर चित्रकार आकाश जेकब, सुलेखनकार महेंद्र जगताप, सौम्या हिदाऊ, शुभांगी दंताळे, सिद्धेश थापा, कौशल ढेरिंगे, तनिष्क उगले, ऋचा उगले, प्राची वासानी, आरती वासानी, आदींसह ३० स्वयंसेवकांनी या पर्यावरण जनजागृतीच्या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे.