निवृत्तीनाथ पालखीचे आषाढी वारीसाठी प्रस्थान

त्र्यंबकेश्वर (सतीश दशपुत्रे) :- संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीत टाळमृदुंगाच्या घोषात त्र्यंबकेश्‍वरहून आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले आहे.

त्र्यंबकेश्‍वर येथून संत निवृत्तीनाथांची पालखी घेऊन हजारो वारकरी विठुरायाचे नाव घेत आषाढीवारी करिता पंढरपुरच्या दिशेने मार्गक्रमण करते झाले. प्रस्थान सोहळ्यात सकाळी 10 वाजेच्या सुमारास संत निवृत्तीनाथ मंदिरात आरती झाली आणि चांदीच्या रथातून पालखी मार्गस्थ झाली. जवळपास पंचवीस ते तीस हजार वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने त्र्यंबकमधूनच वारीत सहभागी झालेल्या अबालवृद्ध वारकर्‍यांची संख्या वाढली आहे. सकाळी संत निवृत्तीनाथ मंदिरात प्रमुख दिंडी चालकांना आणि आलेल्या पाहुण्यांना नारळ प्रसाद देण्याचा कार्यक्रम झाला.

प्रशासक सहायक धर्मदाय सहआयुक्त राम लिप्ते, प्रशासक अ‍ॅड. भाऊसाहेब गंभीरे, मुख्याधिकारी संजय जाधव,पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या हस्ते दिंडीप्रमुखांचे सत्कार करण्यात आले. यावेळी माजी विश्‍वस्त पंडीत महाराज कोल्हे, सौ जिजाबाई लांडे, पुंडलिकराव थेटे, ह.भ.प. जयंतमहाराज गोसावी, रामभाऊ मुळाणे,त्याच प्रमाणे डॉ महामंडलेश्वर लहवीतकर महाराज, गोसावी बंधु, माजी संस्थान अध्यक्ष मुरलीधर पाटील आदिंसह मोठया संख्येने भाविक उपस्थित होते. फुलांनी शृंगारलेल्या रथामध्ये संत निवृत्तीनाथांच्या पादुका असलेली पालखी ठेवण्यात आली होती. मंगलमय वाद्य आणि हरीनामाचा गजर तसेच पालखी पुढे नाच करणारे अश्‍व पालखीची शोभा वाढवीत होते. अग्रभागी नगारा असलेली बैलगाडी होती. संत निवृत्तीनाथ मंदिर चौक रांगोळ्यांनी सजवला होता.

दिंडीत सहभागी होण्यासाठी मागील दोनचार दिवसांपासून वारकरी शहरात येत होते. पांडुरंग कोरडे आणि जयंत महाराज गोसावी यांच्या वतीने संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ मित्रमंडळाच्या वतीने रविवारी सायंकाळी येथे उपस्थित वारकरी भक्तांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.

तिर्थराज कुशावर्तावर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी उपनगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार-सोनवणे,आरोग्य यात्रा सभापती सागर उजे,अशोक घागरे, समीर पाटणकर,कैलास चोथे यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. सत्यनारायण मंदिर मेनरोड येथे महामृत्युंजय प्रतिष्ठान व त्र्यंबकेश्वरचा राजा गणेश मंडळ यांच्या वतीने नगरसेविका शितल उगले व कुणाल उगले यांनी पालखीचे स्वागत करून आरती केली.

जिल्हा पोलीस उपाधीक्षक कविता फडतरे,पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे,उपनिरीक्षक अश्विनी टिळे, राणी डफळ, यासह मेघराज जाधव, सचिन गवळी, साळवी आदींसह सहकारी यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह सर्व मार्गावर वाहने थांबणार नाही याची दक्षता घेत अत्यंत सुंदर नियोजन केले होते. त्र्यंबक पोलीसांनी हॉटेल संस्कृती पर्यंत पायी चालत जाऊन पालखीला निरोप दिला. यावर्षी पालखी सोबत टँकर तसेच आरोग्य पथक सहभागी झाले आहेत. तसेच वारकर्‍यांच्या दिंडी सोबत असलेल्या ट्रक व इतर वाहनांची संख्या वाढली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!