मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (दि. २०) रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांनी ही विशेष भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
राज्यामध्ये सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे दररोज नवनवीन राजकीय घडामोड समोर येत आहेत. दरम्यान शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार यावर काल सुनावणी झाली परंतु पुढची तारीख मिळाल्याने तुर्तास राजकीय वातावरण थंडावले आहे. परंतु शिंदे-फडणवीस यांच्या रात्रीच्या भेटीगाठींबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांची वर्षा या शासकीय बंगल्यावर भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटी मागचे कारण अस्पष्ट असून पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते. पंतप्रधानांचा दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करणार होते. मात्र काही कारणास्तव हा दौरा रद्द झाला आहे. अशातच उपमुख्यमंत्री रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.