मुंबई :- भाजपा शिष्टमंडलाने राजभवनावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत 30 जून रोजी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केल्याचे समजते. त्याचबरोबर महाविकास आघाड़ी सरकारला बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणारे पत्र दिल्याचे समजते.

आज दिल्लीहुन परतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांच्या भेटीला गेले. यावेळी त्यांच्या समवेत चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन असल्याचे कळते. राज्यपाल आता काय भूमिका घेतात त्याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
काल देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. यानंतर त्यांनी दिल्लीला जाऊन अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.
दिल्लीतील बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे बंडखोरी प्रकरणावरून भाजपाच्या बैठकांचे सत्र वाढल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राजभवनाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यआत आले आहे.