देवरे भगिणींनी ७० एकरात साकारले; नाविन्यपूर्ण कृषी पर्यटन केंद्र!

देवळा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाजगाव येथील देवरे कुटुंबातील दोन्ही महिलांनी   वाजगावच्या शिवशी मळ्यात कृषी पर्यटन केंद्र साकारले आहे. याच शिवपर्व कृषी पर्यटन केंद्राचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते बुधवारी (ता.२२) होणार आहे.

सदरचे केंद्र हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी पर्यटन केंद्र ठरणार आहे. सेंद्रिय व फळ शेती करत असतानाच त्यास पर्यटनाचा टच देत वाजगाव येथील प्रगतिशील शेतकरी (कै) कडू अहिलाजी देवरे यांच्या स्नुषा अंजना केवळ देवरे व पद्मा बाळासाहेब देवरे यांनी उभारले आहे. हे शिवपर्व कृषी पर्यटन केंद्र वाजगावच्या शिवशी मळ्यात उभे राहिले आहे.

ग्रामीण भागातील शेती, येथील निसर्ग, वेगवेगळ्या पिकांची, फळाफुलांची ओळख शहरातील मुलांना व्हावी तसेच युवा शेतकऱ्यांना येथील प्रयोगशील शेती कळावी आणि धावपळीच्या जीवनात कुटुंबासमवेत, मित्र-मैत्रिणींसह निसर्ग सानिध्यात मनमुराद विरंगुळा मिळावा या उद्देशातून ७० एकरात या कृषी पर्यटन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

७० एकर जागेच्या परिसरात बहरलेली फळाफुलांची शेती, शिवारातील भटकंती आणि सोबत मनोरंजनाची धमाल मस्ती पर्यटकांना आगळ्यावेगळ्या सहलीचा आनंद देणारी असल्याने येथे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.

हे शिवपर्व कृषी पर्यटन केंद्र पर्यटन संचालनालयाकडून मान्यता प्राप्त आहे. नारळ, आंबा, डाळिंब, सीताफळ, पेरु, सफरचंद, चिकू, अंजीर अशा विविधांगी फळशेतींसह ऊस व इतर पिकांची सेंद्रिय शेती येथे पहावयास मिळते.

रासायनिक खतांऐवजी येथील गोठ्यातील गाईंचे शेणखत आणि गोमुत्रांच्या वापरातूनच येथील जमिनीची सुपीकता वाढविली आहे. आधुनिक शेती, संपूर्ण क्षेत्राला कुंपण, निवासव्यवस्था, अंतर्गत पक्के मुरूम रस्ते, शेती पाहण्यासाठी बांधलेले मोठमोठे मनोरे, शेतीची स्वच्छता यामुळे शहरातील मंडळी याचा आनंदानुभव घेण्यासाठी निश्चित येतील असे वातावरण येथे तयार करण्यात आले आहे.

शिवारात भटकंती करण्यासाठी बैलगाडी-ट्रॅक्टरची सोय, सेल्फी पॉईंट, झोपाळा, बोट रायडिंग, टॉवरवरून शिवारदर्शन, धबधबा, रेन डान्स या सारख्या धमाल, मस्ती, मनोरजंनाच्या अनेक गोष्टी आहे. तसेच व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम असे खेळ खेळण्यासाठी गेमझोन, नारळवाडीत निवासाची व्यवस्था, न्याहारी, चुलीवरचे शाकाहारी जेवण, गावरान भाज्या आणि फळांची लज्जत चाखायला मिळते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!