नवी दिल्ली : विमान प्रवासादरम्यान महिला सहप्रवासाच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणी DGCA ने मोठी कारवाई केली आहे. एअर इंडियाच्या विमानात प्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्या प्रकरणी वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नाही तर विमानाच्या पायलटचे लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याबद्दल फ्लाइटच्या पायलट-इन-कमांडचा परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. तसेच एआयच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सर्व्हिसेसवर ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या प्रकरणामधील आरोपी शंकर मिश्राने आपण असे काहीही केले नसल्याचे म्हटले होते. तक्रारदार महिलेनेच स्वतःच्या अंगावर लघवी केली होती अशी माहिती मिश्राने त्याला दिल्ली न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर दिली होती. त्याच्या या जबाबाने अनेक स्तरामधून आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.
नेमके काय आहे प्रकरण
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा या प्रवाशाने वृद्ध महिलेवर लघुशंका केली होती. घटनेवेळी मिश्रा दारूच्या नशेत होता. या घटनेनंतर पीडित महिलेने दुसऱ्याच दिवशी विमान कंपनीकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
आरोपीवर कोणतीही कारवाई न झाल्याने महिलेने ४ जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपी शंकर मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला ६ जानेवारी रोजी बेंगळुरू येथून अटक केली होती. त्यानंतर मिश्राला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर, एअर इंडियाकडून मिश्रावर ३० दिवसांसाठी उड्डाण बंदी घातली होती.