नवी दिल्ली : शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण कोणत्या गटाचे याचा अंतिम निर्णय ३० जानेवारीला येणार असून, निवडणूक आयोगही आपला निर्णय त्याच दिवशी जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
धनुष्यबाण चिन्हावर अधिकार कुणाचा असणार, या मुद्यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे. पण, आता धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय ३० जानेवारीला निवडणूक आयोग देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ३० जानेवारीला दोन्ही गटांचा युक्तिवाद होणार नाही. ३० जानेवारीपर्यंत फक्त शिंदे गट लेखी उत्तर सादर करणार आहे. ठाकरे गट कोणतेही लेखी उत्तर निवडणूक आयोगाला सादर करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ३० तारखेच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, १६ जानेवारीला झालेल्या सुनावणीमध्ये शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडूनही वकिलांची मोठी फौज युक्तिवादासाठी हजर होती. ’शिंदे गटाने दाखल केलेली कागदपत्रे ही जुनी आहे, महेश जेठमलानी यांनी केलेला दावा हा बोगस आहे. शिवसेनेमध्ये जी फूट पडली आहे त्याचा परिणाम पक्षावर होणार नाही. त्यामुळे ही फूट ग्राह्य धरू नये. ही फूट काल्पनिक असू शकते. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच ही खरी शिवसेना आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत निर्णय घेऊ नये, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता.
तर, शिंदे गटाकडे पुरेसे संख्याबळ आहे. एखादा गट बाहेर पडला तर त्यात गैर काय आहे. आमदार, खासदारांची जास्त संख्या आमच्याकडे आहे. बहुसंख्येकडे नेणारी आकडेवारी महत्त्वाची आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला.
शदे-फडणवीस दिल्ली दौर्यावर
मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौर्यावर आले होते. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौर्यावर आहेत. शिंदे-फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे-फडणवीस आणि अमित शाह यांच्या बैठकीचे कारण अजून समोर आलेले नाही. मात्र राज्य सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा होणार असून, त्यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता वाढली आहे.