नाशिक (प्रतिनिधी) :- अफगाण धर्मगुरू मोहम्मद शरीफ चिस्ती यांच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

पत्रकारांशी बोलताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले की, मागील महिन्यामध्ये येवला येथे अफगाण नागरिक असलेले धर्मगुरू अहमद जरीफ चिस्ती यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली आहे. परंतु गोळी मारण्याची सुपारी देण्यात आलेला आरोपी हा पोलिसांच्या दृष्टिक्षेपात आहे त्याला कोणत्याही क्षणी पोलीस अटक करू शकतात असे त्यांनी सांगितले.

हा शार्प शूटर राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी नाशिकचे पोलीस गेले होते; परंतु त्याने मधल्या काळामध्ये त्याचे लोकेशन बदलल्याचे समोर आले. त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर आहेत. त्याला लवकरच अटक होईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान या सर्व प्रकरणात आता झालेल्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी ची स्थापना करण्यात आली आहे. मनमाडचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे हे आर्थिक व्यवहार कसे झाले त्याची तपासणी करीत आहेत. याबाबत अधिक माहिती लवकरच समोरी येईल, असेही त्यांनी सांगितले.