नाशिक (प्रतिनिधी) :- हॉस्पिटल बांधण्यासाठी कर्ज देतो असे सांगून एक फायनान्स कंपनीच्या संचालकाकडून सातपुरच्या एका डॉक्टरची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. डॉ. गौरव अशोकराव गिते (रा. एम.एच.बी. कॉलनी, सातपूर) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, डॉ. गौरव गिते यांना हॉस्पिटल बांधायचे असल्याने ते व्यंकटेश असोसिएट या फायनान्स कंपनीचे संचालक कमलेश तेजवाणी यांना भेटले. तेजवाणी 1 कोटी 90 लाख रुपयांचे कर्ज करून देतो असे गिते यांना सांगितले. कर्ज मंजूर करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी, प्रोसेसिंग फी व खाते उघडण्यासाठी लागणारी रक्कम व हँडलिंग फी च्या नावाखाली 12 ते 24 मार्च 2021 दरम्यान गिते यांच्याकडून वेळोवेळी 17 लाख 20 हजार रुपये घेतले.

त्यानंतर देखील कर्ज मंजूर न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे गिते यांच्या लक्षात आले. त्यानुसार गिते यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात कमलेश तेजवाणी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.