नाशिकरोड (प्रतिनिधी) :- जुन्या वादाची कुरापत काढून वास्को चौकात दोन मावस भावांवर ओळखीच्या चार युवकांनी प्राणघातक हल्ला केला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की अनमोल शिकलकर व त्याचा मावस भाऊ सोनसिंग शिकलकर हे दुचाकी वरून आपला रिपेअरींगला टाकलेला मोबाईल घेण्यासाठी काल रात्री 8 वाजता वास्को चौकात आले होते. त्याठिकाणी उभे असलेले संशयित शंकर चावरिया, गोरख चावरिया, शुभम चावरिया, सहील चावरिया यांनी मागील भांडणाची कुरापत काढून त्यांच्याशी ते वाद घालू लागले.

त्यांना कुठलाही प्रतिसाद न देता सोनसिंग व अनमोल हे निघून जात असता या चार जणांनी बांबू व लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात अनमोलच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचे पाहून सोनसिंग बाजूला झाला. त्यावेळी देवळालीगाव कुंभारवाडा येथील भगवान देविदास सुर्यवंशी यास ही विनाकारण मारहाण केली.
नागरिकांच्या मदतीने अनमोल व भगवान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हल्लेखोर चावरिया बंधू सिन्नर फाटा शिकलकर वस्तीच्या समोरील आलेल्या सार्वजनिक शौचालय देखभालीचे काम करतात. रोज संपर्कात असल्याने त्यांचे व शिकलकर यांचे किरकोळ कारणावरून वाद आहे. याप्रकरणी सोनसिंग बच्चनसिंग शिकलकर याने पोलीस ठण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.