मुंबई: ई़डीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत.
पुष्पक बुलियन या कंपनीची संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची साईबाबा गृहनिर्मिती कंपनी आहे. या कंपनीच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमधील नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे.
ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती.
ईडीने आज प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिली आहे. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 2017 मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई होती.