मुंबई :– शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांसह 7 ठिकाणी पाहणी केली जात आहे.

ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले. ईडीच्या या कारवाईमुळे अनिल परब यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता ईडीकडून लवकरच अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.
मुंबई, पुणे आणि दापोली परिसरात हे छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान शिवालय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. या सर्व ठिकाणी ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावरही ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तब्बल दोन महिन्यांपासून नवाब मलिक हे तुरुंगात आहेत.
