एकनाथ शिंदे यांचा 50 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या गटात शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा केला असून, ते आज दुपारी विशेष विमानाने येऊन गोव्याच्या राज्यपालांशी पुढील कार्यवाहीसाठी भेट घेणार आहेत.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. काही आमदारांना घेऊन शिंदे सध्या प्रथम सुरतमध्ये व नंतर आसाममधील गुवाहाटीमध्ये गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे 50 आमदार असल्याचा दावा केला आहे.

सुरुवातीला फक्त 12 आमदारांची संख्या 50 पर्यंत गेल्यामुळे शिंदे यांनी राज्यात नव्याने सत्ता स्थापन केली तरी त्यांच्या गटाविरोधात पक्षांतर बंदी कायद्यानुसार सत्तारूढ महाविकास आघाडीला कोणतीही कारवाई करता येणार नाही. शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी सूरतमध्ये जाताना त्यांच्यासमवेत 12 आमदार होते. यानंतर हाच आकडा 40 पर्यंत पोहोचला असून, आणखी 10 आमदार आपल्या गटात येणार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, सूरतला गेलेल्या शिवसेना आमदारांना आज भल्या पहाटे सूरतहून गुवाहाटी येथे एअरलिफ्ट करण्यात आले असून, दुपारपर्यंत काही निवडक आमदारांसह एकनाथ शिंदे हे विमानाने येऊन गोव्याच्या राज्यपालांना आपला स्वतंत्र गट स्थापन केल्याची व त्या गटाला मान्यता देण्याची मागणी करणार आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांचा कारभार तात्पुरता गोव्याचे राज्यपाल पी.श्रीधरन यांना सोपविण्यात आला आहे. कालपासून बंडखोर आमदार गटाच्या वेगवान हालचाली सुरु असतानाच आज दुपारपर्यंत एकनाथ शिंदे यांनी गोव्याच्या राज्यपालांची भेट घेतली आणि स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली तर शिवसेनेच्या फुटीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

स्वत: एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत ’शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत.’ असे म्हटले. मात्र एकनाथ शिंदे यांनी सोबत 40 आमदार असे म्हणत असले तरी पक्षांतर बंदी कायद्यानुसार एकाच पक्षातून त्या पक्षातील दोनतृतीयांश आमदारांनी बंड करून स्वतंत्र गट स्थापन केला तर त्या पक्षाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या 40 आमदारांपैकी शिवसेनेतून फुटलेले आमदार किती आणि पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांची संख्या किती यावर त्यांच्या अधिकृत मान्यतेची शक्यता अवलंबून आहे. बंडखोर गटात शिवसेनेचेच 40 आमदार असतील तर त्याला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळू शकते. मात्र राज्यपाल कोश्यारी रुग्णालयात असल्यामुळे आणि दुसरीकडे राजकीय घटना किती वेगाने घडतात यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

आकड्यांबाबत बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, शिवसेनेचे 33 आमदार आणि 3 अपक्ष असे एकूण 36 आमदार एकत्र आहेत. तर हाच आकडा सांगताना शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी वेगळा आकडा सांगितला आहे. शिरसाट यांनी सांगितले की, आम्ही सर्वजण सोबत आहोत. शिवसेनेचे 35 आमदार आणि 5 अपक्ष असे एकूण 40 आमदार सोबत आहेत. दुपारपर्यंत 46 च्या पुढे जाईल. त्यात शिवसेनेचे 40 आमदार असतील, असाही दावा त्यांनी केला आहे. आपापल्या इच्छेने आणि एकदिलाने आपण इकडे आलो असल्याचे बच्चू कडू आणि शिरसाट यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!