ना. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची  शक्यता

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- शिवसेेनेत स्पष्टपणे फूट पडली असून, ना.एकनाथ शिंदे हे अंदाजे 12 आमदारांसह काल सायंकाळी विशेष विमानाने सुरत येथे गेले असून, त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. या राजकीय घटनेने महाराष्ट्रात भुकंप झाला असून, सत्तारूढ महाविकास आघाडीचे राज्य सरकार पायउतार होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. मात्र ना. शिंदे हे दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत. तर सुरतला गेलेल्या आमदारांना गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या सूचनेनुसार सुरतमधून अहमदाबादला नेण्यात येत आहेत. येथे त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होणार आहे.
भाजपाकडे शंभरहून अधिक स्वत:चे आमदार तसेच अन्य अपक्ष मिळून 135 आमदार असून, त्यांना बहुमतासाठी फक्त बारा आमदारांची गरज आहे. तर एकनाथ शिंदे हे स्वत:सह आणखी 11 आमदार समवेत घेऊन सुरतला गेले होते. त्यामुळे राज्य सरकार कोसळण्याची दाट शक्यता आहे. तर गुजरातच्या एका सूत्राने ना. शिंदे यांच्यासमवेत 28 जण असून त्यामध्ये 13 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत दुपारी 12 ते 2 या दरम्यान ना. एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत शिंदे काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, शिंदे यांनी या राजकीय घटनेनंतर आज फेसबुकवर आपली पहिली पोस्ट लिहिली आहे. त्यात ‘योग म्हणजेच संतुलीत मन,’ सुखी, निरेागी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग….’ असे लिहिली आहे. या पोस्टमध्ये एकाही शिवसैनिकाचा फोटो नसून शिवसेनेचा लोगोही नसल्याने त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे.

ना. शिंदे यांच्या रुपाने झालेला राजकीय भूकंप लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आय पक्षांनी आपापल्या आमदारांशी सतत संपर्क ठेवला असून ते फुटू नये याची दक्षता घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे सार्वजनिक व्यासपीठावर काहीही बोललेलेे नाहीत. नुकत्याच झालेल्या शिवसेना वर्धापन दिन सोहळ्यात त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संधी देऊनही सोहळ्यास संबोधित करण्याचे त्यांनी टाळले. तेव्हापासून एकनाथ शिंदे नाराज आहेत, अशी चर्चा वेगाने पसरली होती. शिंदे यांच्या मुंबई येथील घराबाहेर व ते सुरतच्या लि मेरिडीयन हॉटेलमध्ये आहेत तेथे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!