नाशिकमध्ये वृद्ध दाम्पत्याची नातवाकडून हत्या

नाशिक (प्रतिनिधी) : वृद्ध दाम्पत्याच्या खूनाचा उलगडा तीन तासांत करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. नातवानेच वृद्ध आजी व आजोबांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 2 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कळवण तालुक्यातील उंबरदरी शिवारात राहणार्‍या नारायण मोहन कोल्हे व त्यांच्या पत्नी सखुबाई कोल्हे यांचा अज्ञात इसमाने डोक्यात कुर्‍हाडीने वार करुन त्यांची हत्या केली होती. घटनेची माहिती समजताच पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली.

तपासासाठी त्यांनी पथक तयार करुन फॉरेन्सीक टीम, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, डॉग स्कॉड व तांत्रिक विश्‍लेषण पथकाने तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान कोल्हे यांचा नातू काळु उर्फ राजकुमार हरी कोल्हे (वय 27, रा. वरखेडा शिवार, ता. कळवण) याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान काळुने या वृद्ध दाम्पत्याचा खून केल्याचे सांगितले. कोल्हे दाम्पत्य त्याला वेळोवेळी खर्चायला पैसे देत नसत व नेहमी भेदभाव करत होते. त्यामुळे हा राग मनात ठेवत त्याने दोघांच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करुन त्यांचा खून केल्याचे सांगितले.

पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी तपासी पथकास उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 15 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले. ही कामगिरी पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक भोईर व त्यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!