नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक महानगरपालिकेसह राज्यातील विविध महानगरपालिकांच्या अंतिम मतदार यादी 9 जुलै रोजी प्रसिद्ध होणार होती.
परंतु प्रारूप यादीला प्राप्त झालेल्या हरकत आणि अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आता ही मुदत वाढवून 16 जुलै पर्यंत देण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी ही 16 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात असे नमूद केले आहे की, १४ महानगरपालिकांची अंतिम मतदार यादी दि. ९ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. परंतु या महानगरपालिकांकडे प्राप्त झालेल्या हरकतींची संख्या मोठया प्रमाणात असल्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करून हरकतींचा निपटारा करणे गरजेचे आहे असे आयोगाच्या निर्दशनास आले आहे.
१४ महानगरपालिकांपैकी बृहन्मुंबई, वसई विरार, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई व कल्याण डोबिंवली या महानगरपालिका मुंबई महानगर विकास प्राधिकरण या क्षेत्रामधील आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस असून भारतीय हवामान खात्याने पुढील ४ दिवसासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे या कालावधीत प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करणे जिकीरीचे आहे. म्हणून सदर १४ महानगरपालिकांकरीता प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दि. ९ जुलै, २०२२ ऐवजी १६ जुलै, २०२२ असा सुधारीत करण्यात येत आहे.