नांदगांव (प्रतिनिधी) :- नांदगांव मधील डोखे दुःखी ठरत असलेले अतिक्रमण अखेर पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटक बंद केल्यानंतर अंडरपास तयार करण्यात आला. या अंडरपासमध्ये गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये पुराचे साचलेले पाणी शहरात घुसल्याने आतोनात नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने पारित केलेले आदेश, मध्य रेल्वे भुसावळ मंडळ तांत्रिक अधिकारी यांच्या इन्स्पेक्शन अहवालानुसार मटन मार्केट, लेंडी नदीच्या पुर परिस्थितीला व रेल्वे अंडरपासच्या वाहतुकीला अडथळा ठरल्याने शहरातील ‘मटण मार्केट’ आज अखेर पोलीस बंदोबस्त व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आले.
मागील सात दिवसांपूर्वी गाळेधारक व ओटेधारक यांना अंतिम नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानुसार दोन जेसीबीच्या सहाय्याने अंतिम कारवाई करत मटण मार्केट नेस्तनाबूत करण्यात आले. लेंडी नदी पात्रातील फरशी पुल व पांचाळ गल्लीतील दुकाने व टपऱ्या देखील या कारवाईत काढण्यात आल्या. दरम्यान, ‘आमची रोजी रोटी बंद न करता आम्हाला पर्यायी जागा द्या मगच मटण मार्केट तोडा’ अशी भूमिका गाळेधारकांनी घेतली; मात्र मटण मार्केट काढल्यानंतरच पर्यायी जागेचा विषय घेवू अशी ठाम भूमिका मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी घेत ही कारवाई पूर्ण केली.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात लेंडी नदीला आलेली पूर परिस्थिती व नव्याने उभारण्यात आलेल्या अंडरपास मध्ये पाणी साचल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. तसेच शहरात पाणी घुसून अनेकांचे नुकसान झाले होते. लेंडी नदीची पूरपरीस्थिती व रेल्वे अंडरपासच्या वाहतुकीला या दरम्यान मटण मार्केट अडथळा ठरत होते.
नगरपरिषद प्रशासनाने मटण मार्केटमधील गाळे धारकांना नोटिसा बजावत मार्केट खाली करण्याचे आदेश दिले होते, मात्र गाळेधारकांनी उच्च न्यायालयात दाद मागत या कारवाईला स्थगिती आणली होती. तदनंतर मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील तांत्रिक समितीने अंडरपासची पाहणी करत लेंडी नदी पूरपरिस्थितीला मटण मार्केट अडथळा ठरत असल्याचा अहवाल दिला होता. तसेच उच्च न्यायालयाने देखील याचिकेवर सुनावणी करत अडथळा ठरणारे मटण मार्केट काढण्याचा आदेश पारित केला होता. त्यानुसार नगरपरिषद प्रशासनाने अंतिम नोटीस बजावत आज मटण मार्केट पाडण्यात आले.