मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाच्या दु:खातून देश अजूनही बाहेर पडलेला नसतांना आता पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. बीआर चोप्रा यांच्या महाभारतात भीमची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचे निधन झाले आहे. दिल्ली मधील अशोक विहार येथे राहत्या घरी प्रवीण कुमार सोबती यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते ७४ वर्षाचे होते.

तसेच त्यांची कन्या निपुणिकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला होता. तसेच प्रवीण कुमार सोबती हे अनेक दिवसांपासून आजार आणि आर्थिक संकटाशी झुंज देत होते. त्यांनी आपल्या मजबूत शरीरयष्टीच्या जोरावर एक खेळाडू म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

प्रवीण यांनी आजवर अनेक बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली होती. या मालिकेत त्यांनी भीम ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. प्रवीण कुमार सोबती यांनी अमिताभ बच्चन, जितेंद्र अशा अनेक सुपरस्टारसोबत काम केले आहे. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘रक्षा’ या चित्रपटातून त्यांनी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘मेरी आवज सुनो’मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
दरम्यान प्रवीण हे एक अभिनेता होतेच त्यासोबतच एक अॅथलीट होते. त्यांनी आशिया खेळांमध्ये २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक जिंकले होते. तसेच ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच ते बीएसएफचे जवान देखील होते.