मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो. सध्या बिग बॉस हिंदीचे १५ वे पर्व सुरु आहे. यंदाच्या १५ व्या पर्वातील बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर काल बिग बॉस हिंदीच्या १५ व्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा झाली. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही यंदाच्या बिग बॉस हिंदीच्या १५ व्या पर्वाची विजेती ठरली. तेजस्वीला बिग बॉसची ट्रॉफी आणि ४० लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.

तेजस्वी प्रकाश हे टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. तेजस्वी प्रकाशने अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. बिग बॉसच्या घरातील तेजस्वीचा प्रवास एकदम धमाकेदार आणि तितकाच मजेदार ठरला. करण कुंद्रासोबतची तिची रोमॅन्टिक केमिस्ट्री चांगलीच गाजली. ‘बिग बॉस 15’च्या घरात तेजस्वी व करण कुंद्रा या दोघांची लव्ह केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरली होती.
http://https://www.instagram.com/tv/CZYtiywBJTq/?utm_source=ig_web_copy_link
बिग बॉसच्या टॉप ६ मध्ये तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे स्पर्धक पाहायला मिळाले. पण टॉप ६ मध्ये दाखल झाल्यानंतर रश्मी देसाई ही कमी मतांमुळे बाहेर झाली. तर निशांत भट्टने १० लाख रुपये घेत अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा आणि प्रतीक सहजपाल हे चौघेजण घरात शिल्लक होते. यात तेजस्वी प्रकाश, प्रतीक सहजपाल आणि करण कुंद्रा हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक ठरले. तसेच यातील प्रतीक आणि तेजस्वीने टॉप २ मध्ये प्रवेश केला. त्यानंतर अखेर सूत्रसंचालक अभिनेता सलमान खानने तेजस्वी प्रकाशला यंदाच्या बिग बॉसची विजेती म्हणून घोषित केले. तर प्रतीक हा या शो चा रनरअप ठरला. काल रात्री उशिरा बिग बॉसच्या यंदाच्या पर्वाच्या विजेत्याचे नाव जाहीर करण्यात आले.
दरम्यान आत्तापर्यंत तेजस्वी प्रकाशने अनेक सुपरहिट टीव्ही शोमध्ये काम केले आहे. ‘स्वरागिनी’पासून ‘पहरेदार पिया की’ आणि ‘सिलसिला बदलते रिश्तों का 2’ पर्यंत अनेक शोमध्ये तेजस्वी प्रकाशने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तेजस्वी प्रकाशचे प्रत्येक शोमधील काम प्रेक्षकांनाही आवडले आहे. बिग बॉस 15 च्या आधीही तेजस्वी प्रकाशने अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी 10’मध्येही तेजस्वीचा जलवा पाहायला मिळाला होता. या शोमधील होस्ट रोहित शेट्टीसोबतची तिची बॉन्डिंग देखील लोकांना आवडली होती. तर बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तेजस्वी प्रकाश आता एकता कपूरच्या नागिन ६ या आगामी मालिकेत नागिनच्या भूमिकेत दिसणार आहे.