नवीन नाशिक (प्रतिनिधी):- विल्होळी येथून अंबड एमआयडीसीकडे जाणार्या लिंक रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे पडले आहे. त्यातच पावसाचे पाणी साचल्यामुळे या रस्त्यावर चालणे मुश्कील झाले आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी या रस्त्यावरील उद्योजक व कामगारांनी खड्ड्यात उतरून अनोखे आंदोलन केले.

खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने या रस्त्यावरून ये -जा करणार्या तब्बल 3 ते 4 हजार कामगार वर्गाचा प्रवास खडतर बनला आहे. या ठिकाणाहून अक्षरशः चालणे मुश्किल झाले आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून रस्ता अस्तित्वातच नसल्याने उद्योजकांसह कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे गुरू गजानन इंडस्ट्रियल एरिया येथील तब्बल 30 ते 40 उद्योजकांनी रस्त्यावरील खड्ड्यात उतरून आंदोलन केले.
विल्होळी ते अंबड एमआयडीसी कडे जाणार्या लिंक रोड दरम्यान 80 ते 100 कंपन्या तसेच छोटे-मोठे लघुउद्योजक आहेत. या ठिकाणी 3 ते 4 हजार महिला व पुरुष कामगार काम करून आपला उदरनिर्वाह करतात. तीन ते चार वर्षापासून या ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्ता नव्हे तर नदी वाहत असल्याचे दिसून येत आहे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरात कामगार तसेच मालवाहतुकीसाठी वाहन मिळणे कठीण होत चालले आहे. परिणामी उद्योजक व कामगारांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. पायी चालणार्या तसेच दुचाकी वाहनावरून ये-जा करणार्या कामगारांना खड्ड्यातून तसेच पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. नियमित छोटे मोठे अपघात घडून येत आहे. विल्होळी ग्रामपंचायतने यापूर्वी रस्ता दुरुस्तीसाठी प्रयत्न केले होते. मात्र अपुर्या निधीमुळे कायमस्वरूपी रस्ता शक्य नसल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी असणार्या उद्योजकांकडून शासनाला मालमत्ता कर, वस्तू सेवा कर व अन्य कर शासनाला अदा करत असतात. तरी देखील कंपन्यांकडे जाणारा रस्ताच अस्तित्वात नसल्याने उद्योजकांसह कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या भागातून 2 ते 3 हजार कामगार वर्ग नियमित मार्गक्रम करत असतात रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मोठी दुर्घटना तसेच जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. गुरु गजानन इंडस्ट्रियल एरियातील तब्बल 30 ते 40 उद्योजकांनी रस्त्यावरील खड्ड्यात उतरत आंदोलन केले. यावेळी संबंधित विभाग तसेच स्थानिक आमदारांनी याकडे लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी उद्योजकांसह कामगार वर्गाने केली.
याप्रसंगी माजी सरपंच बाजीराव गायकवाड, उद्योजक कैलास धांडे, नितीन खताळे, सादिक सुरानी, गोविंद डुबेवार, सचिन भकडवारे, अतुल बेंडाळे, प्रतीक अवणकर, भांड, जितेंद्र घोडराव, भोजने, निकम, अमृतकर, कुलकर्णी आदीसह 20 ते 25 उद्योजक व कामगार तसेच आयमाचे पदाधिकारी उपस्थित होते.