नाशिक (प्रतिनिधी) :- शालेय विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याचा विकास व्हावा या उद्देशाने दैनिक भ्रमरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी आणि इयत्ता 8 वी ते 10 वी अशा दोन गटांत शालेय विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रत्येक गटात प्रथम ते तृतीय, तसेच उत्तेजनार्थ 10 अशी 13 रोख आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धांसाठी सुयोजित बिल्डर्स व अशोका बिल्डकॉनने प्रायोजकत्व स्वीकारले आहे. ही स्पर्धा फक्त नाशिक शहरातील शाळांपुरती मर्यादित आहे.
नाशिक एज्युकेशन सोसायटी या स्पर्धेचे संयोजन करीत आहे.
विविध शाळांनी आपापल्या सोयीच्या दिवशी आणि वेळेत ही स्पर्धा दि. 30 जुलैपर्यंत घ्यायची आहे. याबाबतची माहिती पत्रके सर्व शाळांना पाठविण्यात आली आहेत. सर्वांनी मराठी भाषेत स्वत:च्या हस्ताक्षरात निबंध लिहून शाळेत जमा करायचे आहेत. इयत्ता 5 वी ते 7 वी या गटासाठी 500 शब्दांहून अधिक, तर इयत्ता 8 वी ते 10 वी गटासाठी 700 शब्द किंवा अधिक अशी शब्द मर्यादा असून, स्पर्धकाने निबंधाच्या शेवटी आपले नाव, मोबाइल नंबर, पत्ता, शाळेचे नाव असा तपशील लिहावयाचा आहे. नामवंत परीक्षकांकडून परीक्षणानंतर विजेत्या स्पर्धकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला जाईल.
या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या पाल्याच्या शाळेशी किंवा दिलीप अहिरे (मो. नं. 9420594331) व हितेश शाह (मो. नं. 9922111232) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेची वैशिष्टये
- लेखन कौशल्य विकासाला संधी
- विनामूल्य प्रवेश
- प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र
- विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके