Video : माजी मंत्री भुजबळ यांनी केली गोदावरी पुराची पाहणी; अधिकाऱ्यांना दिल्या “या” सूचना

 

नाशिक (राजन जोशी) :– नाशिक शहरातील गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे होत असलेल्या नुकसानाबाबतची पाहणी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी त्यांनी नाशिक मध्ये पूरग्रस्त परिस्थिती होणार नाही यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जोपर्यंत नवीन पालकमंत्री जिल्ह्याला मिळत नाही तोपर्यंत आपण तरी काम पाहावे या हेतूने ही पाहणी केली असल्याचा टोला त्यांनी नवीन सरकारला लगावला आहे.

नाशिक शहरात मागील चार दिवसापासून गोदावरी नदीला पूर आलेला आहे. मुसळधार पावसामुळे पूर ओसरण्यास अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शहरातील जनजीवन विशेष करून गोदावरी काठच्या नागरिकांच्या जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरीच्या काठी असलेले अनेक इमारती आणि वाड्यांचे तळमजले हे गेल्या दोन ते तीन दिवसापासून पाण्यातच आहे. याबाबतची पाहणी करण्यासाठी आज भुजबळ आले होते.

यावेळी त्यांनी सांगितले की, शहरातील गावठाण भागात क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ज्यादा एफएसआय देऊन जुने वाडे किंवा जुन्या इमारती पाडण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. परंतु महापालिकेकडून त्याचा योग्य तो पाठपुरावा होत नसल्याची खंत व्यक्त केली. नाशिकचे जिल्हाधिकारी आणि नाशिक महापालिकेचे आयुक्त हे दोघेही नवीन असल्याने त्यांचा हा पहिलाच पूर आहे. त्यांना नाशिकच्या पुराबाबतची कल्पना नसल्याने एकमेकांच्या संपर्कात राहून नागरिकांना त्रास होणार नाही, अशा सूचना केल्या असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

त्याचबरोबर गंगापूर धरणात पाण्याचा साठा होत असताना टप्प्याटप्प्याने तो विसर्ग करण्यात यावा. एकदम विसर्ग केल्यास मागील काही वर्षांपूर्वी प्रमाणेची परिस्थिती उद्भवू शकते, या पुरामुळे व्यापाऱ्यांचे तर नुकसान झालेच आहे. परंतु नागरिकांना सुद्धा घराबाहेर पडणे अवघड झाले आहे असे त्यांनी सांगितले. तसेच काझी गढीच्या प्रश्नाबाबतही येत्या काळात पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात नवीन सरकार स्थापन झाले असल्याने अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशिवाय अन्य मंत्र्यांची निवड झालेली नाही. त्यामुळे या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि या जिल्ह्याबद्दल असलेले प्रेम त्यामुळे नवीन पालकमंत्री येईपर्यंत आपणच कारभार पहावा या हेतूने ही पाहणी केली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर शहरात असलेले सत्ताधारी पक्षाच्या तीन आमदारांपैकी एकाही आमदाराने पाहणी केली नसल्याबाबत विचारले असता ते पण लवकरच पुर पाहण्यासाठी येतील अशा भुजबळ पद्धतीने त्यांनी टोला लगावला.

या पाहणी दरम्यान माजी नगरसेवक गजानन शेलार, वत्सला खैरे यांनी या परिसरातील परिस्थिती बाबतची माहिती भुजबळ यांना दिली. तर यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अंबादास खैरे, जिल्हाध्यक्ष रविन्द्र पगार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा

Video : https://youtu.be/_b2zfZvp1MA

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!