नाशिक (प्रतिनिधी) :- व्यसनी मुलाशी झालेल्या भांडणातून दगडावर डोके आपटून मुलाचा खून केल्याप्रकरणी बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत येवला तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे यांनी फिर्याद दिली आहे. संदीप बाळासाहेब आगवणे (वय 32, रा. कातरणी, ता. येवला, जि. नाशिक) असे दगडावर आपटल्याने मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, की संदीप आगवणे याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे संदीपची बायको त्याला सोडून निघून गेली होती. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला संदीप हा काल पहाटे चारच्या सुमारास दारू पिऊन घरी आला. त्यावेळी त्याचे वडील बाळासाहेब अण्णासाहेब आगवणे (वय 54, रा. कातरणी) हे समोर आले. त्यावेळी संदीप म्हणाला, की तुम्ही माझे लग्न चांगल्या मुुलीसोबत करून दिले नाही. म्हणून ती मला सोडून निघून गेली, असे म्हणून भांडण करू लागला. मुलाचे हे वागणे वडिलांना जिव्हारी लागल्याने दोघांमध्ये हमरीतुमरी झाली.
कातरणी ते समिट रेल्वे स्टेशनकडे जाणार्या रस्त्यावर बापलेकांची मारामारी झाली. या हाणामारीत वडील बाळासाहेब आगवणे यांनी मुलगा संदीप आगवणे याला उचलून डोक्यावर आपटले. त्यामुळे संदीपच्या डोक्याला रस्त्यावरील खडी आणि दगडाचा मार लागल्याने गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने संदीप हा जागीच ठार झाला. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात मयताचे वडील बाळासाहेब आगवणे यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.