नाशिक (प्रतिनिधी)- अन्न व औषध प्रशासन विभागाने धोकादायक तेलाचा वापर करणाऱ्या नाशिक मधील रॉयल बेकर्स यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे हॉटेल व बेकरी व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत सहा ठिकाणी तपासणी करण्यात आल्याचे समजते.
सातत्याने त्याच तेलाचा वापर करून परत परत पदार्थ बनविणाऱ्या हॉटेलवर आणि व्यावसायिकांवर सोमवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई आणखी कडक होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नासिक कार्यालयाकडून देण्यात आली.
सातत्याने तळण्यासाठी घेण्यात आलेले तेल त्यामध्ये अजून दुसरं तेल ओतून मिक्स झालेल्या तेलाच्या माध्यमातून पदार्थ बनविण्याच्या घटना नासिक मध्ये वाढत आहेत. त्यामुळेच नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. यासाठी म्हणून टोटल पोलर कंपाउंड रिडींग मीटरचा वापर केला जात आहे.
त्या माध्यमातून वेगवेगळ्या भागांमध्ये तपासणी केली जात आहे आणि त्या तपासणीनंतर 25% च्या आत मात्र आल्यावर ही कारवाई केली जात आहे. या तेलाच्या माध्यमातून हृदयविकार उच्च रक्तदाब, धामण्य कठीण होणे, स्थूलपणा, मधुमेह यासारखे गंभीर आजार होत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी जागृत राहून परत परत तळलेल्या तेलाचे पदार्थ खाणे योग्य नाही आणि त्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे असे आवाहन नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त गणेश परळीकर यांनी केले आहे.
सातत्याने तळलेल्या पदार्थाच्या माध्यमातून होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अशा घटना रोखण्यासाठी सातपूरच्या रॉयल बेकर्स येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे संयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त विवेक पाटील अन्नसुरक्षा अधिकारी संदीप देवरे, अमित रासकर, योगेश देशमुख, प्रमोद पाटील, यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. याबाबत पुढील कारवाई सुरू असून तातडीने गुन्हा दाखल करण्याचे काम देखील सुरू आहे.
आतापर्यंत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सहा ठिकाणी तपासणी केली आहे येणाऱ्या दिवसांमध्ये ही कारवाई अधिक गतिमान करण्यात येणार असून नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल आणि इतर व्यवसायिकांवर देखील कडक कारवाईचे करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची परळीकर यांनी दिली.