नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील कापूस व्यापारी गोकुळ कोठारी यांच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करून त्यांच्या ताब्यातील ४४ लाख २६ हजार रुपये किंमतीच्या गुटख्यासह एक अशोक लेलॅंड कंपनीचे वाहन जप्त केले आहे. आरोपी फरार झाला आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील कापसाचे व्यापारी गोकुळ बाबुलाल कोठारी यांच्या कडे गुटखा विकला जात असल्याची गुप्त माहिती नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती.

या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभाग नाशिक यांच्या पथकाने गोदामावर छापा टाकला असता व्यापारी गोकुळ कोठारी हे उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागले. पथकाने धडक कारवाई करत गोदामातील पोत्यांमध्ये दडुन ठेवलेले सुगंधित पानमसाला गुटखा तंबाखू आदी साहित्य जप्त केले. नंतर संबंधित व्यापाऱ्याने बहाणा करून त्या ठिकाणावरुन पोबारा केला. याच दरम्यान अन्य एका व्यक्ती जैन (पुर्ण नाव समजू शकले नाही) यांनी पथकातील अधिकारी यांना धमकावण्याचा प्रयत्न केला असता पथकाने नांदगाव येथून पोलीस कुमक मागवून घेत कारवाई सुरूच ठेवली. यामध्ये गोडाऊन जवळ उभ्या असलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या वाहनात देखील काही गुटखा लपवून ठेवला असल्याचे दिसून आले. या कारवाईत एकूण 44 लाख 26 हजार रूपये किमतीचा सुगंधित पान मसाला व तंबाखू पुड्या असा प्रतिबंधित साठा आणि वाहन असा एकूण 46 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला केला असून संशयित आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अनिल उत्तमराव रासकर (रा. नाशिक) यांनी नांदगाव पोलिसांत फिर्याद दिली असून भादंवी कलम 353, 328, 223,179 सह अन्न सुरक्षा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मनोज वाघमारे, पो.ना.अनिल गांगुर्डे, पो.ह.बागुल, दिपक मुंढे, अभिजित उगलमुगले, शांताराम महाले, चालक किरण राऊत आदी या कारवाईत सहभागी झाले होते.