नागपूर : येथे सिगारेटच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे.

या गोळीबारात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गणेश प्रसाद असे गोळीबार करणार्या सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. त्याच्याकडे लायसन्स असलेली बंदुक होती. सिगारेट मागण्यावरून झालेला हा वाद विकोपाला पोहोचला आणि एकमेकांना मारहाण करण्यापासून फायरिंगपर्यंत पोहोचला.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वस्ती नगरमध्ये सीआरपीएफमधून निवृत्त जवान गणेश प्रसादचे दुकान आहे. त्या दुकानात सकाळी दोघे जण आले आणि त्यांनी 20 सिगारेटची मागणी केली. मात्र दुकानदाराने 20 सिगारेट देऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यातून यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. आरोपी त्या ठिकाणावरून निघून गेले, मात्र थोड्या वेळाने ते हातात विळा आणि काठी घेऊन पुन्हा परत आले. त्यावेळी दुकानदाराची पत्नी दुकानात होती, त्यांनी तिला मारहाण केली. हे पाहून दुकानदार धावून आला आणि त्यांच्यात वाद वाढला. त्यात आरोपीने त्याला मारहाण केली.
यानंतर निवृत्त जवानाने घरात जाऊन आपली बंदूक आणली आणि त्यातून फायर केले. त्यातील एक गोळी एकाच्या खांद्याला लागली, त्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.