नाशिक (राजन जोशी) -नाशिक महानगरपालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संध्याकाळ पर्यंत ऑनलाईन पाहता येणार आहे. सध्या विभागीय कार्यालयांमध्ये यादी उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती उपयुक्त मनोज घोडे पाटील यांनी दिली आहे.

नासिक महानगरपालिकेची निवडणुकीच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आली होती. या प्रारूप मतदार यादीवर 3 जुलैपर्यंत हरकती घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. हरकतीच्या कालावधीत महापालिकेला 3,851 हरकती प्राप्त झाल्या. हरकतींची संख्या जास्त असल्यामुळे सर्व हरकती निकाली काढण्याचे सूचना महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिल्या होत्या. नागरिकांनी दिलेल्या हरकतींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून हरकतींची शहानिशा केली होती.
महापालिकेचे अंतिम मतदार यादी 16 जुलै रोजी प्रसिद्ध करण्याचे सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या परंतु मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ही मुदत 21 जुलै पर्यंत वाढवून देण्यात आली होती. ही मुदत वाढवून मिळाल्यानंतर आज (दि. 21) रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ऑनलाईन यादी सायंकाळपर्यंत उपलब्ध होणार आहे ऑनलाइन यादी अपलोड करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.