नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली अर्थ मंत्रालयाच्या एका कर्मचार्याला अटक करण्यात आली असून, पैशांच्या मोबदल्यात इतर देशांना गोपनीय माहिती पाठवत असल्याचे यातून उघड झाले आहे.
सुमीत असे कर्मचार्याचे नाव आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली असून, तो अर्थ मंत्रालयात कंत्राटी कर्मचारी आहे. पैशांच्या मोबदल्यात मंत्रालयातील गोपनीय माहिती इतर देशांना पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सुमितकडून पोलिसांनी एक फोन जप्त केला आहे. त्या फोनद्वारेच तो हेरगिरीची कामे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ऑफिशियल सिक्रेट कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमीत ही संवेदनशील माहिती कोणाला पुरवत होता? त्यामागे नेमके कारण काय आहे? याची चौकशी पोलीस करीत आहे. तसेच मंत्रालयात तैनात असलेल्या इतर कर्मचार्यांचीही चौकशी केली जात आहे.

सुमीतच्या कारणाम्यात आणखी कोणा कर्मचार्याचा समावेश आहे काय याचीही चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. अर्थसंकल्पापूर्वी ही अटक झाल्यामुळे हेरगिरीचा संशय व्यक्त केला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जर बजेटशी संबंधित डेटा लीक झाला तर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.