चेन्नई :– अभिनेता कमल हसन एका अडचणीत सापडले आहेत. त्यांचा बहुचर्चित विक्रम हा चित्रपट येत्या ३ जूनला प्रदर्शित होत आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटातील एका गाण्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘पत्थला पत्थाला’ हे गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे कमल हसन यांनी लिहिले असून अनिरुद्ध रविचंदर यांनी ते संगीतबद्ध केले आहे. मात्र याच गाण्यामुळे कमल हासन अडचणीत सापडले आहेत. ‘पत्थला पत्थाला गाण्यामुळे त्यांच्याविरोधात एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

विक्रम या चित्रपटातील ‘पत्थला पत्थाला’ या गाण्याचे बोल वादग्रस्त आहेत. यामुळे केंद्र सरकारची अप्रत्यक्षरित्या खिल्ली उडवली जात आहे. तसेच यामुळे लोकांमध्ये फूटही निर्माण होत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते सेल्वम यांनी केला आहे.
त्यामुळे या चित्रपटाच्या टीमने गाण्याच्या लिरिक्समध्ये बदल करुन ते काढून टाकावे, अशी विनंती त्या सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे. या प्रकरणी कमल हसन यांच्याविरोधात चेन्नई येथील पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस तक्रारीवर काहीही कारवाई न झाल्यास ‘विक्रम’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णयही सेल्वम यांनी घेतला आहे.