नाशिक शहर परिसरात तीन ठिकाणी आग; अंबड लिंकरोडची आग 4 तासांनी आटोक्यात

नाशिक (प्रतिनिधी) :- शहरात तीन विविध ठिकाणी आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पहिली घटना सातपूर-अंबड लिंकरोडवर घडली. या ठिकाणी मिना ट्रेडर्स जवळ एका भंगारच्या गोडावूनला रात्री दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, सातपूर, सिडको, मुख्य अग्निशमन विभाग, विभागीय अग्निशमन दल व एमआयडीसी येथील आठ गाड्या आग विझविण्यासाठी मागविण्यात आल्या होत्या. पहाटे 6 वाजेपर्यंत सुरु असलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला दहा खेपा माराव्या लागल्या. अग्निशमन दलाचे अधिकारी बंबासह तातडीने हजर झाल्याने शेजारीच असलेल्या इतर भंगार गोदाम व घरांना कोणतीही हानी झाली नाही. ही आग रात्री लागल्याने सुदैवाने जीवीतहानी टळली. इम्तियाज खान यांच्या मालकीचे हे भंगार गोदाम आहे. आगीत प्लास्टिक, फोम, लाकडे, केमिकल पावडर, वॉल कम्पाऊंडशीट, 30 ते 40 ड्रम, पुठ्ठे, कागद, इतर स्क्रॅप मटेरियल व परिसरात उभी असलेली आयशर गाडी जळून पूर्ण खाक झाले.

दुसरी घटना गौळाणेरोडवर घडली. कैलास चुंभळे यांच्या मालकीच्या भंगार गोदामाला रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागून आगीत कापूस, नायलॉन व इतर स्क्रॅप मटेरियल जळून खाक झाले. सुरुवातीला आग विझविण्यासाठी एक बंब मागविण्यात आला होता. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने दुसरा बंब मागविण्यात आला. सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आली. आगीचे कारण समजू शकले नाही.

तिसरी घटना सातपूर येथील हॉटेल अयोध्यामध्ये घडली. पुणे येथील एक प्रवासी या हॉटेलमध्ये पहिल्या मजल्यावर थांबला होता. रात्री दीड वाजेच्या सुमारास त्या इसमाला उग्र वास आल्याने व गुदमरल्याने जाग आली. उठून पाहिले असता त्याला एसीमधून धूर येत असल्याचे दिसले. त्याने ताबडतोब या घटनेची माहिती हॉटेल व्यवस्थापनाला कळविली. घटनेनंतर एक मिनिटात अग्निशमन दलाचा बंब येथे दाखल झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी ही आग त्वरीत आटोक्यात आणत अडकलेल्या व्यक्तीची सुटका केली.

या आगी विझवण्यासाठी सातपूर अग्निशमन केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रदीप परदेशी, विजय मुसळे, ताराचंद सूर्यवंशी, अशोक मोरे, रामचंद्र खारे, ढगे, सय्यद शेख, तसेच सिडको अग्निशमन दलाचे वाहनचालक एम.पी. अहिरे, एन.के. व्यवहारे, सी.जी. लहामगे, एस.डी. भालेराव, एस.डी. शिलावट यांनी परिश्रम घेऊन तिन्ही ठिकाणच्या आग आटोक्यात आणत त्यांच्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!