जातेगावला भीषण आगीत घरासह संसारोपयोगी साहित्य भस्मसात

नांदगाव (महेंद्र पगार):- तालुक्यातील घाटमाथा परिसरातील जातेगांव येथील रहिवासी रमेश सुदाम गायकवाड यांच्या राहत्या घराला सकाळी अचानक आग लागून राहत्या घरासह संसारोपयोगी साहित्य व रोख रक्कम भस्मसात झाले.

या दुर्घटनेमूळे गायकवाड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या दुर्घटनेमुळे गरीब कुटुंबाचा संसार आगीत खाक झाल्याने जातेगांव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जातेगांव येथील रहिवासी रमेश सुदाम गायकवाड यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. यावेळी या घरातील सर्व व्यक्ती मजुरीसाठी बाहेर गेलेल्या होत्या. राहत्या घराला अचानक लागलेल्या भीषण आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे परिसरात एकच तारांबळ उडाली होती.

परिसरातील नागरिकांनी तत्काळ आग विझविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत भीषण आग आटोक्यात आणली. तोपर्यंत आगीने संसारोपयोगी साहित्याला पूर्णतः आपले भक्ष्य बनविले होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. नांदगावचे मंडल अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन झालेल्या दुर्घटनेचा पंचनामा केला.

या भीषण आगीत गायकवाड यांच्या राहत्या घरासह, संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, दागिने, रोख रक्कम, स्कूटर, सर्व कपडे व किरकोळ वस्तू आदींसह एकूण दोन लाख एकाहत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद केली. त्याचबरोबर मुलांचे शालेय दाखले, रेशनकार्ड, जातीचे दाखले, विविध शासकीय कामीचे ओळखपत्रे, तसेच इतर अत्यावश्यक कागदपत्रेही आगीने भक्ष्य बनविली. या भीषण आगीच्या दुर्घटनेने गायकवाड परिवारावर पडलेल्या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या कुटुंबाला तत्काळ शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

जातेगाव येथील झालेल्या जळीत दुर्घटनेमुळे गायकवाड कुटुंबियांवर जे संकट कोसळले त्यांच्या मदतीसाठी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. मी मुंबई येथे असल्याने शिवसेनेचे प्रतिनिधी जातेगांव येथे पाठविले असून त्यांनी सदर कुटुंबियांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली व त्यांना तत्काळ संसारोपयोगी साहित्य उपलब्ध करून आवश्यक ती मदतही करण्यात येईल.

– आमदार सुहास कांदे, नांदगाव

ही दुर्घटनेची माहिती मिळताच मी जातेगाव येथे दाखल होऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. या भीषण आगीत गायकवाड कुटुंबियांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मी तहसीलदारांशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. गायकवाड कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.

-माजी आमदार पंकज भुजबळ, नांदगाव

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!