नाशिक (रामदास नागवंशी) :- शहरातील द्वारका परिसरात एका झोपडपट्टीतील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत चार जण होरपळल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की द्वारका परिसरात संत कबीरनगर झोपडपट्टी आहे. या ठिकाणी आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट होऊन एका घराला भीषण आग लागली. यानंतर शेजारील घरांमधून एकापाठोपाठ एक अशा चार सिलिंडरचा स्फोट होऊन झोपडपट्टीतील अनेक घरांना आगीने वेढले.

हा भाग झोपडपट्टीचा असल्यामुळे अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी घेऊन जाणे अवघड होत होते. आग भीषण असल्यामुळे नाशिक शहरातील सहाही अग्निशमन दलांचे दहा बंब आणि अंबड एम. आय. डी. सी. चा एक असे अकरा बंब घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आगीने रौद्र रूप धारण करताच काही रहिवासी गॅस सिलिंडर घेऊन घरांच्या बाहेर पडले; मात्र अन्य घरांतही गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्यामुळे आगीने भयानक रौद्र रूप धारण केले. अवघ्या अर्ध्या तासांत संपूर्ण झोेपडपट्टीत ही आग पसरली. घटनास्थळी चार रुग्णवाहिकादेखील तैनात आहेत. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडथळे निर्माण होत होते.