लासलगावला टायरच्या गोडाऊनला भीषण आग

 

लासलगाव :- येथील बडोदा बँकेच्या समोर असलेल्या शिव रस्त्यावर टी पी टायरच्या गोडाऊनला दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली. आगीचे लोळ इतके प्रचंड होते की या टायरच्या गोडाऊन मधून प्रचंड आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दिसत होते. आसपासच्या परिसरात आगीची धग जाणवत होती. त्यामुळे शेजारील कांद्याच्या गोडाऊनला देखील ठिकठिकाणी आग लागल्यामुळे कांद्याच्या गोडाऊनचे सुद्धा मोठे नुकसान झाले. धुरामुळे हा परिसर पार काळवंडून गेला.

या गोडाऊन मधील लाखो रुपये किमतीचे सर्वच टायर जळाल्यामुळे प्रचंड धूर निर्माण झाला. आग विझवण्याच्या कामात धुरामुळे अडथळे येत होते. या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी उसळल्यामुळे रेल्वे स्टेशन मार्गावरही रहदारी खोळंबली होती. लासलगावला अग्निशामकची गाडी नसल्यामुळे आग विझवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. पिंपळगाव बसवंत, चांदवड, मनमाड व येवला येथून तातडीने अग्निशामकच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या. सुरुवातीला लासलगाव ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी व स्थानिक युवकांनी देखील पाण्याचे टँकर सह आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आगीचे लोळ इतके प्रचंड असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्यात येत होते.

आग लागण्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून या घटनेतील पुढील तपास लासलगाव पोलीस ठाण्याचे स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि रामकृष्ण सोनवणे व पोलीस कर्मचारी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!