नवीन नाशिक (प्रतिनिधी) :- येथील उपेंद्र नगर भागात काल रात्री 11.30 वाजेच्या सुमारास आरपीआयचे नाशिक विधानसभा अध्यक्ष प्रशांत खंडेराव जाधव (वय 33, रा. उपेंद्र नगर, सिडको) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात जाधव जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

येत्या काही दिवसात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. सिडको भागात महापालिका निवडणुकीपूर्वीच गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आरपीआयच्या विधानसभा अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून यात त्यांच्या मांडीत गोळी शिरली असून ते या हल्ल्यात बचावले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रशांत जाधव हे काल रात्री घरी जात असताना उपेंद्रनगर येथे त्यांच्या घराजवळच साडेअकरा वाजेच्या सुमारास एका दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने जाधव यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी जाधव यांच्या डाव्या पायाच्या मांडीत घुसली. गोळीबार केल्या नंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच असलेल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात हल्लेखोरांचा पोलिस तपास करीत आहे.