शिर्डी ((भ्रमर वृत्तसेवा) :- भारत गौरव योजनेअंतर्गत देशातील पहिली खासगी रेल्वे सकाळी निर्धारित वेळेच्या एक तास आधी शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशनवर पोहोचली. मंगळवारी कोईम्बतूर येथून या साऊथ स्टार रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता.

त्यानंतर आता ही रेल्वे 830 प्रवासी घेवून शिर्डीत दाखल झाली आहे. या रेल्वेने आलेल्या प्रवाशांचे यावेळी स्वागत करण्यात आले. वेळेआधीच पोहचल्याचे समाधान आणि पहिल्या खाजगी रेल्वेत बसण्याचा आनंद साईभक्त प्रवाशांच्या चेहर्यावर दिसून आला.
तिरुपूर, इरोड, सेलम जोलारपेट, बेंगळुरू येलाहंका, धर्मावरा, मंत्रालयम रोड आणि वाडी असे थांबे पार करुन तिला सकाळी 7:30 वाजता साईनगर रेल्वे स्थानकावर पोहोचणे निर्धारित केले होते. मात्र ही फुलांनी सजवलेली रेल्वे सकाळी वेळेच्या आधीच एक तास साईनगर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर पोहचली. यातून 830 प्रवासी शिर्डीत दाखल झाले आहेत. प्राईव्हेट रेल्वेच्या चालकाचा आणि आलेल्या भाविकांचा यावेळी सन्मान करत स्वागत करण्यात आले.
रेल्वेने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला 2 वर्षांसाठी लीजवर दिली आहे. सर्व्हिस प्रोव्हायडरने कोचच्या जागांचे नूतनीकरण केले आहे. महिन्याला किमान तीन ट्रीप केल्या जातील. यात फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण 20 डबे आहेत. ट्रेनचे भाडे भारतीय रेल्वेकडून आकारल्या जाणार्या नियमित रेल्वे तिकीट दरांच्या बरोबरीचे आहे. शिर्डी साईबाबा मंदिरात विशेष दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. ट्रेनची देखभाल हाऊसकीपिंग सर्विस प्रोवाइडर्सद्वारे केली जाईल, जे संपूर्ण प्रवासादरम्यान काही काही वेळाने साफसफाई करतात. तसेच ट्रेनमध्ये शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.रेल्वे पोलीस दलासह रेल्वे कॅप्टन, एक डॉक्टर, खासगी सुरक्षा कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे.