सातपूरच्या खून प्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप

नाशिक (प्रतिनिधी) :- पार्टी करून हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर धक्का लागल्याच्या कारणावरून पाच मित्रांनी त्यांचाच मित्र राहुल शेजवळ याच्या डोक्यात लोखंडी गज घालून चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे राहुल शेजवळ मरण पावला. सुमारे दहा वर्षांपूर्वी झालेल्या या खून प्रकरणी कोर्टाने पाचही आरोपींना विविध सहा कलमांखाली जन्मठेपेसह 40 हजारांचा दंड व सश्रम कारावासाच्या शिक्षा ठोठावल्या आहेत.

सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दहा वर्षांपूर्वी दि. 7 डिसेंबर 2011 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मयत राहुल भास्कर शेजवळ व त्याचे पाच मित्र त्र्यंबक रोडवरील सोनाली गार्डनमध्ये पार्टीसाठी गेले होते. पार्टी संपवून बाहेर आल्यानंतर राहुल शेजवळ याचा धक्का लागला म्हणून त्याचे मित्र राकेश मधुकर जाधव (वय 29), शरद ऊर्फ दिगंबर बबन नागरे (वय 25), अनिरुद्ध धोंडू शिंदे (वय 22), लक्ष्मण छबू गुंबाडे ऊर्फ बादशहा (वय 26) व दीपक भास्कर भालेराव (वय 26, सर्व रा. पिंपळगाव बहुला) यांनी धक्का लागल्याच्या कारणावरून राहुल शेजवळ याच्यावर चाकूने हल्ला करून त्याच्या डोक्यात लोखंडी गज टाकला. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने राहुल शेजवळ याचे निधन झाले.

या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे यांनी तपास करून कोर्टात खटला पाठविला. या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय येथे होऊन आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय ए. एस. वाघवसे यांनी निकाल दिला. त्यानुसार वरील सर्व पाचही आरोपींना भा. दं. वि. कलम 302 व 149 अन्वये जन्मठेप व एक हजार रुपये दंड, भा. दं. वि. कलम 326 व 149 अन्वये सात वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजारांचा दंड, भा. दं. वि. कलम 143, 147, 148 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) 135 या प्रत्येक कलमान्वये सहा महिने कारावास व पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे, तसेच दंड न भरल्यास जादा कारावास भोगावा लागणार आहे.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस. जी. कडवे यांनी काम पाहिले, तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी पोलीस हवालदार बी. एस. काकड व इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कोर्ट अंमलदार एस. यू. गोसावी यांनी आरोपींना शिक्षा लागण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पाठपुरावा केला.

आरोपींना जन्मठेपेसह सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. गुन्हा शाबित होण्याच्या दृष्टीने संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, तसेच पोलीस उपायुक्त (गुन्हे) व पोलीस उपायुक्त (परिमंडळ 2) यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!