नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लपून बसलेल्या चार जणांना वनविभागाच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून शिकारी साठी लागणारे साहित्य देखील वनविभागाच्या पथकाने जप्त केले आहे. यामुळे जिल्ह्यात वन्यजीव हा असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने वनविभागाने वेगवेगळ्या स्वरूपाच्या कारवाया सुरू केल्या आहेत. यामध्ये काही महिन्यांपासून वन्यजीवांची तस्करी करणार्या वेगवेगळ्या पथकांवर देखील वन विभागाने छापा मारून कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर वन्यजीव पाळणाऱ्या नागरिकांवर देखील आता वनविभाग कारवाईच्या तयारीत असतानाच जिल्ह्यात वन्यजीवांची शिकार करण्यासाठी काही पथके अजूनही तयार असल्याचे समोर आले आहे.
याबाबत वन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की नाशिक त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या आडोळी येथील कक्ष क्रमांक 520 च्या जवळ गस्त घालत असताना वनविभागाच्या पथकाला काही संशयित लपून बसल्याचे आढळून आले. त्यानंतर या पथकाने या ठिकाणी पाहणी सुरू केली असता या ठिकाणी लपून बसलेले तुकाराम दिवे, हरी तानाजी जाधव, काळूबाळू बेंडकोळी, विष्णू सोनू शिंदे असे चार जण लपून बसल्याचे आढळून आले.
या चौघांनाही वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन कोयते, एक विळा, 31 काठ्या, दोन मोटारसायकली आणि 8 वाघरी आदी साहित्य मिळाले आहे. त्यांच्या विरोधात वनविभाग कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक गणेश झोळे, यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक भदाने व त्यांच्या पथकाने केली आहे.