मुंबई : राज्याचे माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दीपक सावंत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. घोडबंदर रोडवर दिल्ली दरबार हॉटेल जवळ ही घटना घडली आहे.
अधिक माहितीनुसार, माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीचा काशी मिरा येथे डंपरने मागच्या बाजूने धडक दिल्याने ते जखमी झाले आहे. सावंत यांच्या मणक्याला मार लागला असल्याची माहिती मिळाली आहे. मोखाडा येथे झालेल्या दोन कुपोषित मुलांच्या मृत्यू संदर्भात माहिती घेण्यासाठी सावंत मोखाडा येथे जात होते. दरम्यान डॉ. सावंत हे उपचारासाठी स्वतःहुन मुंबईतील अंधेरी येथील क्रीटी केअर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मोखाडा येथील सावरडे गावामध्ये दोन कुपोषित बालकांचा नुकताच मृत्यू झाला आहे. त्यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी व बालकांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत मोखाडा येथे जात होते. सकाळी साडे अकराच्या सुमारास काशी मिरा येथील सगणाई नाका येथे त्यांच्या गाडीला डंपर ने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की सावंत यांच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली तसेच गाडीचे ही मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक पोलिस सावंत यांना रुग्णवाहिकेमधून जवळच्या रुग्णालयात नेत होते. परंतु सावंत यांनी आपण स्वतःच रुग्णालयामध्ये दाखल होत असल्याचे सांगून ते रुग्णवाहिकेमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
सावंत हे मुंबईतील अंधेरी येथे असलेल्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले असल्याचे काशी मिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यानी सांगितले. दरम्यान डंपर चालक इर्शाद खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.