माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे पुण्यामध्ये निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. चिपळूण येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केले. परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. परंतु त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांचे निधन झाले.

गेल्या १५ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ पुण्यामधील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची आज प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. नागनाथ कोत्तापल्ले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु होते. तसेच चिपळूनण येथे पार पडलेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन तसेच समीक्षापर लेखन केले आहे. यामध्ये पापुद्रे, ग्रामीण साहित्य : स्वरुप आणि शोध, साहित्य अन्वयार्थ,  नवकथाकार शंकर पाटील, मराठी कविता एक दृष्टीक्षेप, साहित्याचा अवकाश हे त्यांचे समीक्षणपर लेखन प्रसिद्ध आहे.

नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च, १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यामधील मुखेड येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर बीए मराठीचे शिक्षण त्यांनी देगलूर महाविद्यालयामधून पूर्ण केले यामध्ये ते मराठवाड्यामध्ये तिसरे तर मराठी विषयामध्ये पहिले आले होते. १९८० मध्ये औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून डॉ. यु. म. पठाण सरांच्या मार्गदर्शनाने ‘शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर त्यांनी पीएच. डी. चे संशोधन केले होते.

ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते तसेच २००५ पासून २०१० पर्यंत कोतापल्ले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले. दरम्यान, नॅक, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, राज्य मराठी विकास संस्था, बालपुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे काम देखील त्यांनी पाहिले आहे.

कोत्तापाल्लींना मिळालेले पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर साहित्य पुरस्कार

महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार –

मूड्स (१९७६)

संदर्भ (१९८४)

ग्रामीण साहित्य (१९८५)

गांधारीचे डोळे (१९८५)

‘ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध’साठी परिमल पुरस्कार (१९८५)

‘राख आणि पाऊस’साठी महात्मा फुले पुरस्कार (१९९५)

‘राख आणि पाऊस’साठी बी. रघुनाथ पुरस्कार (१९९५)

‘ज्योतिपर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक (२००२)

उद्याच्या सुंदर दिवसासाठी (२००२)

यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार (२००१)

दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार (२०१८)

‘साहित्य अवकाश’साठी शिरीष गांधी साहित्य पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!