मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कामकाजावर टीका करत त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला काहीच अर्थ राहिला नाही, असं रामदास कदम म्हणाले. माझ्यावर अनेकदा टीका करण्यात आली. मात्र माझं म्हणणं मांडण्यासाठी मला मीडियासमोर कधीच जाऊ दिलं नाही. एवढेच नाही तर मला आणि माझा मुलगा योगेश कदम आमदार याला वारंवार अपमानित करण्याचा प्रयत्न पक्षातून झाला, असा आरोप रामदास कदम यांनी केला.
शिवसेनेत अभूतपूर्व झालेल्या बंडात रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम शिंदे गटात सामील झाले. या बंडाच्या पार्श्वभूमीवर 25 जून रोजी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला रामदास कदम अनुपस्थित होते. मात्र एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत आपण पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही. मी मरेपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. मी पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. मी कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. मुलांना मतदारसंघात त्रास दिला जातो हे खरं आहे. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच असणार आहे, असं रामदास कदम म्हणाले होते. परंतु आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.