नाशिक (प्रतिनिधी) :- शॉर्ट स्वाईप करून स्टोअरमधील वस्तूंच्या विक्रीतून जमा झालेली अडीच लाख रुपयांची रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याचा प्रकार अशोकनगर येथे घडला. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी वसिम युसूफ शेख (वय 24, रा. अश्विनी पार्क, शिवाजीनगर, सातपूर) हे अशोकनगर येथे असलेल्या माय जिओ स्टोअर्सचे काम बघतात. या दुकानात आरोपी मनोज सदाशिव जगताप (रा. सातपूर) हा काम करतो. जगताप याने दि. 1 मार्च ते दि. 7 मे 2022 या कालावधीत दुकानातील 88 हजार 32 रुपये शॉर्ट स्वाईप करून स्टोअरमधील विक्री केलेल्या वस्तूंची एकूण 93 हजार 537 रुपयांची रोख रक्कम व जिओची 18 हजार 500 रुपये रोख याशिवाय 49 हजार 998 रुपये किमतीचे वन प्लस लॉर्ड सीई-2 हे 8/128 जीबीचे दोन मोबाईल असा एकूण 2 लाख 50 ेहजार 67 रुपयांचा अपहार केला.

ही बाब लक्षात आल्यानंतर शेख यांनी जगताप याच्याकडे चौकशी केली असता त्याने अपहार केलेल्या रकमेपैकी 93 हजार 500 रुपयांची रक्कम स्टोअरला जमा केली. उर्वरित रकमेचा अपहार केला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनोज जगताप याच्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.