नाशिक : कंपनी मालकाकडूनच एक कोटी रुपयांचा अपहार

नाशिक (प्रतिनिधी) :- कामगारांच्या पगारातून कपात केलेली 1 कोटी 4 लाख रुपयांची रक्‍कम क्रेडिट सोसायटीत जमा न करता तिचा अपहार करणार्‍या कंपनी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत संतोष अशोक कदम (वय 54, रा. भगीरथ संकुल सोसायटी, इंदिरानगर, नाशिक) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यात म्हटले आहे, की सातपूर एमआयडीसीत आरोपी श्याम चंद्रकांत केळुस्कर (वय 68, रा. रामानंद हाईट्स, साधू वासवानी रोड, कुलकर्णी कॉलनी, सातपूर) यांची सातपूर एमआयडीसीत प्रिमियम टूल्स प्रा. लि. नावाची कंपनी आहे.

केळुस्कर यांनी सप्टेंबर 2000 पासून कंपनीतील कामगारांच्या पगारातून सोसायटीच्या मागणीनुसार शेअर्स आणि कर्ज हप्‍ता व त्यावरील व्याज यापोटी कपात केलेली रक्‍कम महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 49 (2) अन्वये ज्या दिवशी रक्‍कम कापून घेतली; मात्र ही रक्‍कम त्याच दिवशी प्रिमियम टूल्स एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., सातपूर, नाशिक या संस्थेकडे जमा करणे आवश्यक असताना व वेतन प्राधान्य अधिनियम 1936 अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे त्यांना देणे असलेल्या वेतनाचा भाग आहे, असे समजून संस्थेकडे कामगारांकडून कपात केलेली रक्‍कम भरणे आवश्यक होते; मात्र कंपनीचा मालक केळुस्कर याने सप्टेंबर 2014 पासून एकूण 1 कोटी 3 लाख 90 हजार 987 रुपयांच्या रकमेची कर्मचार्‍यांच्या पगारातून कपात केली; परंतु ही रक्‍कम क्रेडिट सोसायटीत भरणे बंधनकारक असताना ही रक्‍कम जमा केली नाही, तसेच ही रक्‍कम अप्रामाणिकपणे स्वत:च्या फायद्यासाठी वापरून कामगारांचा विश्‍वासघात करून रकमेचा अपहार केल्याची बाब लक्षात आल्यानंतर सातपूर पोलीस ठाण्यात कंपनीचा मालक श्याम केळुस्करविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनी मालकाला काल अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!