नागपूरः एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एका कुटुंबाची 26 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाल हरीशचंद्र पराते हे एका कंपनीत व्यवस्थापक आहेत. त्यांची मुलगी मोनिका हिने नीट उत्तीर्ण केले होते आणि तिला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता. तिच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरु असताना 10 मार्च रोजी कामरान नामक इसमाने पराते यांना फोन करून त्यांच्या मुलीला बंगळुरूच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगितले. मात्र पराते यांनी महाराष्ट्रातील महाविद्यालयातच प्रवेश पाहिजे असल्याचे त्याला सांगितले. काही वेळाने त्याने पुन्हा त्यांना फोन करत मुंबईच्या परळ येथील सेठ जी.एस.मेडिकल कॉलेज व रुग्णालयात प्रवेश मिळू शकते असे सांगितले. पराते तयार झाल्याने कामरानने त्यांना मुंबईला भेटण्यासाठी बोलावले.
पराते दाम्पत्य मुंबईला गेले असता कामरानने व्यस्त असल्याचे सांगत राकेश पाटील नावाच्या व्यक्तीशी बोलण्यास सांगितले. त्यांनी राकेशशी संपर्क साधला असता त्याने महाविद्यालयाच्या नावाने 1.12 लाख रुपयांचा डीडी बनविण्यास सांगितले. डीडी बनविल्यानंतर पराते पुन्हा मुंबईला गेले. कामरानने तो डीडी महाविद्यालयाच्या प्रशासकीय विभागाचे अधिकारी मयंक अग्रवाल यांना देण्यास सांगितले. डीडी घेतल्यानंतर मयंकने प्रवेशासाठी 25 लाख रुपये डोनेशन द्यावे लागेल असे सांगितले.
पराते यांनी कशी बशी 15 लाख रुपयांची व्यवस्था केली आणि ते पैसे मयंक आणि राकेश यांच्याकडे दिले. 5 एप्रिलला मोनिकाच्या ईमेलवर प्रोव्हीजनल अॅडमिशन लेटर पाठविण्यात आले. त्यानंतर मयंकने उर्वरित 10 लाख रुपये घेऊन मुंबईला बोलावले. परातेंना मुंबईला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मयंकने त्यांना दिल्लीच्या यस बँकेत आशीष जयस्वालच्या खात्यात आरटीजीएस करण्यास सांगितले. पराते यांनी जयस्वालच्या खात्यात पैसे आरटीजीएस केले. प्रोव्हीजनल लेटरमध्ये 18 एप्रिलला महाविद्यालयात हजर राहण्यास सांगितले होते.
पराते मुलीसह मुंबईला पोहोचले मात्र राकेश आणि मयंक त्यांना भेटायला आले नाही. कॉलेजच्या अधिष्ठ्यांची भेट घेऊन विचारपूस केली असता प्रोव्हीजनल लेटर बनावट असल्याची माहिती मिळाली. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर पराते यांनी पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांनी घडलेला सर्व प्रकार कथन केला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी गोपाल हरीशचंद्र पराते यांच्या तक्रारीवरून कामरान खान, मयंक अग्रवाल, राकेश पाटील आणि आशीष जयस्वाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.