दगडाने ठेचून मित्राने केली मित्राची हत्या

सातपूर (राजू अनमोला) :- गंगापूर रोडवरील सोमेश्‍वर कॉलनी परिसरात भर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एका युवकाचा चाकूहल्‍ला करीत व दगडाने ठेचून त्याच्या मित्रानेच खून केला. या हत्येमुळे परिसरात व नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

योगायोगाने याचदरम्यान महिला कॉन्स्टेबल सरला खैरनार या त्याच भागातून जात असताना त्यांनी ही घटना पाहिली व आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत त्याही किरकोळ जखमी झाल्या असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. घटनेचे वृत्त समजताच पोलीस आयुक्‍त जयंत नाईकनवरे व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत माहिती अशी, की मयत पवन नथू पगारे (रा. कानिफनाथनगर, श्रीकृष्णनगर, सातपूर कॉलनी) आणि संशयित आरोपी अतुल अजय सिंग (रा. सोमेश्‍वर कॉलनी) हे दोघे युवक मित्र काल रात्रीपासून परिसरात फिरत होते. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कॅनॉल रोड, सोमेश्‍वर कॉलनी परिसरात त्यांचा कशावरून तरी वाद झाला. या वादातून संतापलेल्या संशयित आरोपी अतुल अजय सिंग याने पवन पगारे याच्यावर चाकूहल्‍ला केला व नंतर दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. यात पवन पगारे याचा मृत्यू झाला. याच वेळी रस्त्याने जाणार्‍या महिला कॉन्स्टेबल सरला खैरनार यांनी ही झटापट पाहून धाव घेतली आणि आरोपीस पकडले.

या घटनेचे वृत्त समजताच पोलीस आयुक्‍त जयंत नाईकनवरे, उपायुक्‍त अमोल तांबे, गुन्हे शाखेचे उपायुक्‍त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्‍त दीपाली खन्ना, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख आदींनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन संशयितास ताब्यात घेतले व घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस आयुक्‍त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी नाशिकरोड भागात पहाटेच्या सुमारास पुण्याहून आलेल्या एका नागरिकाचे गुंडांनी आर्थिक लुटीच्या आमिषाने दगडाने ठेचून हत्या केली होती. पाठोपाठ सोमेश्‍वर कॉलनी परिसरात दगडाने ठेचूनच हत्या करण्यात आल्यामुळे सातपूर व गंगापूरसह नाशिक शहरात या हत्येने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, यादृष्टीने योग्य तपास व्हावा, अशीही मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!