फायनान्स कंपनीचा माजी रिकव्हरी एजंटच निघाला मोटारसायकल चोर

नाशिक :– माजी रिकव्हरी एजंट असणाऱ्या संशयिताने शहरातील विविध भागांतून तब्बल 20 हुन अधिक दुचाकी चोरणाऱ्या संशयिताला पकडण्यात गंगापूर पोलिसांना यश आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गंगापुर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे दाखल होता. दरम्यान शहरात दुचाकीचोरीच्या घटना बघता पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू होता.

या गुन्ह्याचा तपास चालु असतांना पोलीस नाईक गिरीश महाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहरातून दुचाकी चोरणारा हा सिटी सेंटर मॉल च्या मागे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी त्या ठिकाणी सापळा रचला होता. 26 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास तो संशयित तेथे आला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुल देविदास मुसळे (वय ४४, रा. अंबिका अपार्टमेंट, त्रिमुर्ती चौक, अंबड, नाशिक) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचा नाव आहे. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने शहरातून दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्या ताब्यात असलेली मोटार सायकल ही देखील चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

राहुल मुसळे यांस विश्वासात घेवून त्याचेकडे तपास केला असता त्याने नाशिक शहर भागातील एकुण २० मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्या काठेगल्ली, वडाळा, सिडको, उपनगर, मनमाड याभागातुन हस्तगत करण्यात आल्या. त्यामध्ये गंगापुर पोलीस स्टेशन कडील एक, सरकारवाडा, इंदिरानगर, अंबड, भद्रकाली या पोलीस स्टेशन कडील गुन्हे उघडकीस आणुन त्याच्याकडुन एकुण ६ लाख ६५ हजार रूपये किमंतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.

ही उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त दिपक पांडेय, पोलीस उप आयुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती दिपाली खन्ना व गंगापूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापुर पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सुर्यवंशी, उपनिरीक्षक संजय भिसे, सचिन शेंडकर, पोलीस हवालदार भरत बोळे, पोलीस नाईक गिरीश महाले, रविंद्र मोहिते, मिलींदसिंग परदेशी, गणेश रहेरे, योगेश चव्हाण, पोलीस शिपाई दिपक जगताप, समाधान शिंदे, तुळशीदास चौधरी, सोनु खाडे, घनश्याम भोये यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे करीत आहेत.

असा करायचा दुचाकी चोऱ्या
राहुल मुसळे हा एका फायनान्स कंपनीत रिकव्हरी एजंट म्हणून कामास होता. नंतर त्याने नोकरी सोडली. तेव्हा त्याच्याकडे 1 चावी राहून गेली होती. त्याने सहज एका मोटारसायकलला ती चावी लावून पाहिली असता, ती दुचाकी सुरू झाली अन इथून सुरू झाला राहुल मुसळेचा दुचाकी चोरीचा प्रवास. तो जिल्हा रुग्णालय, ठक्कर बझार येथून अनेकदा मोटारसायकल चोरायचा आणि ती दुचाकी केवळ 6 हजार रुपयांना तो विकून टाकायचा.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!