सिन्नरला गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) :- सिन्नर तालुक्यातील मुसळगाव एमआयडीसी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. मुसळगाव एमआयडीसी परिसरातील उज्ज्वलनगरमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात दोघा सख्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

एकीकडे गॅस स्फोटाच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. दुसरीकडे अनेकदा गॅस लीक किंवा गॅसचा चुकीच्या वापरामुळे अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. सिन्नर तालुक्यात आता गॅस स्फोटाची घटना समोर आली असून यात दोन सख्ख्या भावांना आपला जीव गमवावा लागला आहे. कृष्णचंद्रा देवराज साकेत (27) व दीपराज देवराज साकेत (19) अशी या दोघांची नावे असून या घटनेत शुभम महादेव सोनवणे हा चौदा वर्षीय मुलगा गंभीर भाजला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सिन्नर शहराजवळ मुसळगाव एमआयडीसी आहे. या ठिकाणी अनेक कंपन्या असल्याने सिन्नर शहरासह अन्य राज्यातून कामगार वर्ग वास्तव्यास आहे. उज्वलनगर येथे हे दोघे बंधू वास्तव्यास होते. मूळचे उत्तरप्रदेशातील असणारे साकेत बंधू हे काही दिवसांपासून मुसळगाव एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात नोकरी करीत होते. सकाळी सात वाजेच्या सुमारास एकाने चहा बनविण्यासाठी गॅस पेटवला. मात्र, तत्पूर्वीच गॅस गळती झालेली असल्याने गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. त्यात हे तिघेही गंभीर भाजले.

दरम्यान घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच जखमींना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, कृष्णचंद्रा हा जवळपास 70-75 तर दिपराज हा 60 ते 65 टक्के भाजल्याने दोघांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!