घोटीत घरावरील छाप्यात गांजासह गावठी पिस्तूल जप्त

इगतपुरी (वार्ताहर) : तालुक्यातील घोटी येथे पोलिसांनी घरावर छापा मारून गावठी कट्टा आणि सात किलो गांजा जप्त केला असून, छाप्यानंतर मुख्य आरोपी पळून गेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई केली जात आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या देखील आवळल्या जात आहेत. अवैध व्यावसायिकांविरुद्ध विविध ठिकाणी छापे टाकून ही कारवाई ग्रामीण पोलिसांचे पथक करीत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक उमाप यांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील इंदिरानगर परिसरात एका व्यक्तीच्या घरामध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तातडीने पोलीस अधीक्षकांनी या घराची झडती घेण्याचे आदेश सबंधित अधिकार्‍यांना दिले. त्यानंतर पोलिसांनी या घरावर छापा टाकून झडती घेतली. यावेळी पोलिसांना या घरामध्ये सात किलो गांजा मिळाला. त्यानंतर अधिक तपास केला असता आरोपीच्या घरातून एक गावठी कट्टा देखील जप्त करण्यात आला.

पोलीस कारवाई सुरू असताना आरोपी घराच्या मागील दरवाजाने पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!