नील कुलकर्णी

नारायणशेठ उदेराम वैश्य मथुरेहून 100 वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आले आणि त्यांनी कुरमुरे, रेवडी विक्रीच्या व्यवसायापासून स्वयंरोजगाराला प्रारंभ केला. पुढे धान्यविक्रीच्या व्यवसायात ते उतरले. नीतिमत्ता, उच्च व्यावसायिक तत्त्व आणि ग्राहकांचा विश्वास ही त्रिसूत्री नारायणशेठ वैश्य यांनी अंगी बाणवली. पुढे त्यांचे सुपुत्र सुरेश वैश्य आणि त्यांचे चिरंजीव शैलेश आणि मितेश हे आजोबा आणि वडिलांच्या रक्तातून आलेले हेच गुण घेऊन वैश्य डिस्ट्रीब्यूटर्सच्या माध्यमातून व्यापारात यश मिळवीत आहेत. वैश्य परिवारातील उद्यमशीलता, कष्टाळूपणा व उच्च व्यावसायिक मूल्ये यातच त्यांच्या यशाचे गमक दडले आहे. चार ते सहा लोकांना घेऊन सुरू झालेल्या या व्यवसायाचा प्रवास आज 120 कर्मचार्यांसह प्रगतीकडे झेप घेत आहे. मे. वैश्य डिस्ट्रीब्यूटर्स, मे. लक्ष्मीनारायण एजन्सी, भगर मिल असे अनेक उद्योग वैश्य परिवारातर्फे आज यशस्वीपणे सुरू आहेत.
सुरेश वैश्य यांचा व्यावसायिक प्रवास
सुरेश वैश्य यांचे वडील नारायणशेठ उदेराम वैश्य मथुरेजवळील सुरयी गावातून शंभर वर्षांंपूर्वी व्यवसायासाठी महाराष्ट्रात स्थलांतरित झाले. प्रारंभी त्यांनी रेवडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर कुरमुर्यांची भट्टी सुरू करून त्याचीही विक्री केली. त्यानंतर व्यापार, व्यवसायाचा अनुभव घेऊन रविवार कारंजा येथे मे. नारायण उदेराम वैश्य नावाने धान्याच्या ठोक विक्रीचा व्यापार सुरू केला. नारायणशेठ वैश्य यांच्यात व्यवसायाच्या गुणासह नेतृत्वाचे गुण होते. त्याकाळी ते नाशिक इंडस्ट्रीयल को-ऑपरेटीव्ह इस्टेटचे संस्थापक सदस्य होते. त्यांचे मित्र बाबूशेठ राठी यांनी नारायणशेठ वैश्य यांना उद्योगाकडे वळविले. 50 च्या दशकात नारायणशेठ वैश्य यांनी भगर मिलची स्थापना केली. त्या काळात नाशिक अत्यंत छोटे शहर होते. लोकसंख्या अत्यंत कमी होती. लोकांचे राहणीमान साधेे आणि भौतिक गोष्टींपासून कोसोमैल दूर होते. लोकांची क्रयशक्तीही कमी होती. त्यावेळी भगर मिलची उभारणी करून वैश्य यांनी भगर उद्योगात प्रगतीचा आलेख आखण्यास सुरुवात केली. अशोकस्तंभावर त्यांनी घर घेऊन आपल्या मुलांना व्यवसाय व व्यापारात आणत उद्यमशीलता व व्यावसायिक मूल्यांचे धडे देण्यास सुरुवात केली.
त्यावेळी सुरेश वैश्य यांनी शिक्षण सुरू असतानाच वयाच्या पंधराव्या वर्षी वडिलांच्या धान्य विक्रीच्या व्यवसायात रस दाखविण्यास सुरुवात केली. मुलाचा व्यवसायातील रस बघून नारायणशेठ वैश्य यांनी सुरेश वैश्य यांना व्यवसायातील अनुभवातून घेतलेले बाळकडू त्यांना दिले. सुरेश वैश्य यांनी कमी वयातच व्यवसायात घेतलेले निर्णय व मेहनत बघून नारायणशेठ वैश्य यांनी त्यांच्या हातात कमी वयात व्यापाराच्या चाव्या सुपूर्द केल्या. अत्यंत कमी वेळेत त्यांनी व्यवसायाची पूर्ण कमान हाती घेऊन विलक्षण चिकाटी आणि एकाग्रतेने वडिलांनी दिलेली जबाबदारी लिलया पेलली. मार्केटमध्ये नवीन व्यक्ती जेव्हा उतरते, तेव्हा ग्राहकांचा विश्वास संपादन करणे आणि त्याद्वारे ग्राहकांच्या गरजा वेळेत पूर्ण करून त्यांना संतुष्ट करणे हे काम आव्हानात्मक असते. या कामात तुमचा नेम चुकला, तर स्थिरस्थावर झालेला धंदा बसण्याचा धोका असतो; मात्र, सुरेश वैश्य यांनी त्याकाळी ग्राहकांचा विश्वास जोडण्यासह व्यवसायात प्रचंड मेहनत घेतली. वडिलांच्या व्यवसायाचा विस्तार करून त्यांनी सर्व भावांनाही उद्यमशीलतेचे धडे दिले.
सन 1992 मध्ये आयटीसी वितरण एजन्सी घेऊन एका नव्या व्यवसायात पदार्पण केले. अंबड इंडस्ट्रीयल एरियामध्ये 80 च्या दशकात नंतर मे. वैश्य इंडस्ट्रीज नावाने दाल मिल सुरू केली. भगर मिल, वैश्य इंडस्ट्रीज हे वडिलोपार्जित व्यवसायही त्यावेळी सुरू होते. भगर मिल त्यांचे बंधू उमेश वैश्य पाहत होते. रविवार कारंजा येथील व्यवसायात सुरेश वैश्य, तसेच अशोक वैश्य जबाबदारी सांभाळत असत. त्या काळी भगर सेवनातून विषबाधेचे प्रकार झाले. त्यावेळी भगर उत्पादक संघटनांनी एकत्र येऊन भगरीमुळे विषबाधा होत नाही, हे भगरीचे नमुने प्रयोगशाळेत तपासून घेऊन सरकारला सिद्ध करून दाखविले आणि भगरीच्या उद्योगातील संघर्ष दूर केला.
शैलेश आणि मितेश यांचा व्यवसायात प्रवेश
सुरेश वैश्य यांचे चिरंजीव शैलेश हे महाविद्यालयीन जीवनात वडिलांच्या धान्य विक्रीच्या दुकानात येत असत; मात्र त्यावेळी शैलेश यांना व्यापारातील उलाढाली, विक्री कौशल्य याबद्दल काहीच कळत नसे. त्यावेळीही वडील सुरेश वैश्य मुलांना बिझनेसचे धडे देत. व्यापाराचे मार्गदर्शन घरातूनच मिळाल्यामुळे शैलेश यांची व्यापारात रुची वाढत गेली. आपणही पुढे बिझनेसला करिअर मानून पुढे जाण्याचा त्यांचा कल मग टप्प्याटप्प्याने अधिक विकसित होत गेला. दरम्यान, वयाच्या 20 व्या वर्षी वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण होताच शैलेश हे वडिलांच्या व्यवसायात पूर्णपणे उतरले; मात्र सुरेश वैश्य यांनी व्यवसायातील खाचखळगे मुलांना माहीत व्हावेत यासाठी कंपनीच्या प्रतिनिधींकडून शैलेश यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले. शैलेश हे कुमारवयात विक्री प्रतिनिधींसोबत मार्केटमध्ये फिरत. खेडोपाडी, तालुका वाड्यांवर वडिलांची गाडी जात तेव्हा त्यांच्यासोबत जाऊन बिझनेसचे फंडे ते शिकू लागले. व्यापारी लोकांशी, कंपनीच्या प्रतिनिधींशी, तसेच ग्राहकांशी कसे बोलावे, याचे प्रत्यक्ष अनुभव व धडे शैलेश घेऊ लागले. वडिलांनी आपल्या आजोबांकडून कमावलेले आणि वडिलांनी तावून सुलाखून स्वत:ही अनुभवातून कमावलेली व्यावसायिक मूल्ये मुलांमध्येही हळूहळू उतरत गेली. शैलेश सांगतात त्यांना एमबीए मार्केटिंगमध्ये करण्याची तीव्र इच्छा होती; मात्र वडिलांनी प्रत्यक्ष फिल्डवर अनुभवातून दिलेले बिझनेस शिक्षण माझ्यासाठी कुठल्याही विद्यापीठाच्या एमबीए पदवीमध्ये मिळणार्या पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्षात अनुभूतीतूनच मोठा अनुभव देऊन गेले.
आयटीसी हा बिझनेस सुरू झाल्यानंतर शैलेश यांनी व्यवसाय ज्ञान अद्यावत करण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली. मे. वैश्य ट्रेडर्स नव्या काळाची पावले ओळखून विकास, प्रगती आणि बदल करीत गेले. त्याकामी शैलेश यांची मोठी भूमिका होती. यामुळे बिझनेसमध्ये प्रगती होत गेली. कामे जलद व पद्धतशीररीत्या वेळेत सुनियोजितपणे पूर्ण होत गेली. कंपनीच्या अपेक्षा वाढत होत्या आणि शैलेश यांच्यावर त्यांच्या वडिलांनी पूर्ण विश्वास टाकत नवे बदल घडवले. याची पावती म्हणून आयटीसी कंपनीने मे. वैश्य डिस्ट्रीब्यूटसर्र् यांना ‘बेस्ट मार्केटिंग फर्म’ या पुरस्काराने सन्मानित केले. या पुरस्काराने त्यांचे उद्योगातील मनोबल वाढण्यासह प्रोत्साहन मिळाले. सुरेश वैश्य यांचे दुसरे चिरंजीव मितेश यांनीही याच उद्योगात पूर्णपणे काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पंचवटीतील कारभार मितेश सांभाळू लागले, तर शैलेश यांनी नाशिक रोडवरील फर्मचे काम सांभाळण्याकडे लक्ष दिले. कालांतराने नाशिकरोड येथील फर्म सिडको येथे स्थलांतरित करण्यात आली. आज वैश्य परिवाराच्या चार फर्म कार्यरत आहेत. मे. नारायण उदेराम वैश्य हे धान्याचे दुकान, सिडकोतील श्री लक्ष्मी नारायण एजन्सी, अशोक भगर मिल सातपूरमध्ये व पंचवटीतील मे. वैश्य डिस्ट्रीब्यूटर्स अशा चार फर्म वैश्य परिवार चालवीत आहेत.
मोठे बंधू शैलेश यांच्या प्रमाणेच वडील सुरेश वैश्य यांनाही मितेश यांना अगदी कमी वयात बिझनेश धडे मिळावे म्हणून शिकत असतानाचा व्यवसायाचा अनुभव मिळावा यासाठी प्रोत्साहन दिले. वडिलांच्या शिरस्त्यानुसार मितेश कॉलेज जीवनात असतानाच व्यवसायाकडे वळाले. सन 1995 ते 2000 या काळात पूल पार्लरला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत असे. शैलेश वैश्य यांनी लहान भावाला हाच पूल पार्लरचा सेटअप सन 1997 मध्ये उभारून दिला. मितेश वयाच्या अठराव्या वर्षी अकरावीत असताना कॉलेजरोडवर पूल पार्लरच्या व्यवसायात उतरले. शिकत असताना व्यवसायतातून ‘बिझनेस’चे धडे घेण्यास त्यांनी सुरुवात केली. या काळात ते आपल्या वडिलांच्या ठोक धान्य व्यापाराच्या दुकानात जाऊन व्यापाराचे धडे गिरवीत असत. वडिलांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. शिक्षणासह त्यांना व्यावसायिकतेचे धडे ते लहान वयापासूनच देत असत. मितेश यांची शिक्षणात गती होतीच. त्यांना संगणक व सॉफ्टवेअरचे शिक्षण घेऊन विदेशात नोकरी करावी असे वाटत असे. बी. कॉम. चे शिक्षण आणि नंतर संगणकाच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा डिप्लोमा त्यांनी के. के. वाघ कॉलेजमधून पूर्ण केला. त्यानंतर एसीडी एक्स्पोर्टचेही शिक्षण त्यांनी बोस्टन अॅकॅडमीतून पूर्ण केले. मितेश यांचे पर्चेस आणि लॉजिस्टीक हे दोन्ही विषय अत्यंत चांगले असल्याने त्यांना विदेशातील एका कंपनीत नोकरीची संधीही चालत आली होती. मात्र, त्या दरम्यान त्यांचा विवाह झाल्याने त्यांनी ही संधी नाकारली. मितेश यांना वडील, भाऊ यांच्याकडून घरातच व्यापार, उद्योगाचे धडे मिळत गेल्याने तेही शिक्षण घेता घेताच होलसेल धान्य व्यापारात उतरले. दरम्यान, शैलेश यांनी मितेश यांना रिटेल बिझनेसचे, मार्केटिंगचेही उत्तम ट्रेनिंग दिले. धान्याच्या व्यापारासाठी आपला चुलत भाऊ प्रितेश याला प्रशिक्षित करुन त्यांच्याकडे हा व्यवसाय देऊन सन 2008 मध्ये मितेश हे आयटीसी उत्पादन विक्रीच्या वैश्य ड्रिस्ट्रीब्यूटीर्समध्ये पूर्ण वेळ उतरले.
आयटीसीची बहुविध उत्पादने होती; मात्र बाजारपेठेत त्याबद्दल जागृती नव्हती. अनेक उत्पादने असल्याने त्याची माहिती ग्राहकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचत नव्हती. किरकोळ विक्रेत्याचा कल केवळ अनेक उत्पादनांची विक्री करण्याकडे आणि त्याचा स्टॉक दुकानात ठेवण्याकडे होता. मितेश व्यवसायात उतरताच त्यांनी या सर्व उत्पादनांची माहिती किरकोळ विक्रेत्यांना करून दिली. कस्टमर ट्रेनिंग प्रोग्रॅम घेतले. मालाची विक्री करण्यासाठी काय करावे यासह त्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उत्तम कार्य केले. यातून नवीन ओळखी वाढत गेल्या. यापूर्वी ड्रिस्टीब्यूटर्स कधीही कस्टमरला भेटायला जात नसे. या नव्या उपक्रमाने त्यांच्या व्यवसायात होलसेल ग्राहकही वाढू लागले. त्याचा मोठा फायदा व्यवसायात होत गेला.
दरम्यान, वॅटची नवीन करप्रणाली लागू झाल्यानंतर परराज्यातील माल नाशिकमध्ये येऊन विक्री होत असे. याचे कारण आपल्या राज्यात वॅटचा दर जास्त होता. त्यामुळे मध्यप्रदेशातून माल इकडे येऊन विक्री होत असे. हे टाळण्यासाठी पोलिसांच्या मदतीने टोलनाक्यावर याची कडक तपासणी करुन परराज्यातील माल येथे विक्री होण्यापासून रोखण्याचे आव्हान त्यांना करावे लागले. स्पर्धेच्या युगातच मॉर्डर्न ट्रेेंडसोबत ऑनलाईन बाजाराशी स्पर्धा करत व्यवसायाला स्थिर ठेवणे मोठे आव्हान होते. ती आव्हानेही पेलून वैश्य ड्रिस्ट्रीब्यूटर्सने व्यवसायाची कमान चढती ठेवली.
नेतृत्वाचे गुण आणि सामाजिक उपक्रम
सुरेश वैश्य यांनी प्रारंभीपासून नाशिक धान्य व्यापारी संघटनेमध्ये अध्यक्ष तसेच सदस्य म्हणून योगदान दिले. नामको बँकेचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी योगदान दिले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सवर त्यांनी काम केले. गाडगे महाराज पतसंस्थेला देणगी देण्यासह संस्थेला मोफत धान्य दिले जाते. साडेतीन ते चार हजार लोकांना कोविड काळात वैश्य परिवाराच्या व्यवसायातर्फे मदत करण्यात आली. नाशिकमधील आदिवासी पाड्यांवर मदत करण्यात आली. तहसील कार्यालय, पोलीस डिपार्टमेंट यांच्यासह कोविड योद्धांना धान्य वाटप, पॅकबंद जेवणाचे डबे वाटप करण्यात आले. टाळेबंदी मध्ये मजूर, कामगारांना येण्याजाण्याची समस्या होती. अशा स्थलांतरित लोकांना आस्थापनेतर्फे फूडपॅकेट, हॅण्डवॉश, बिस्कीटे, फळे, जेवणाचे डबे पुरविण्यात आले.
व्यापार्यामध्ये संघर्ष, संकटांचा अडथळा..
व्यापार, व्यवसायात चढ उतार सुरूच असतात. एकदा सुरेश वैश्य नाशिकरोडवरुन शहरात येत असताना त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला. त्यामध्ये त्यांना मोठ्या इजा झाल्या. या कठीण प्रसंगात प्रबळ इच्छाशक्तीने त्यांनी अपघातातून स्वत:ला सावरले आणि पुन्हा व्यापाराकडे पहिल्यासारखे लक्ष घालून व्यवसायाला दिशा दिला. यासह मोठ्या दरोड्यातूनही त्यांनी व्यवसायवर काढला. वैश्य डिस्ट्रीब्युटर्समध्ये रोख उलाढाल अधिक असल्याने सन 2006-07 मध्ये त्यांच्या पंचवटीमधील फर्ममधून 70 लाख रुपयांचा माल दरोडेखोरांनी चोरुन नेला. मोठे भांडवल त्यात गुंतवले होते ते एकाच क्षणात होत्याचे नव्हते झाले. या संकटातूनही सावरत वैश्य परिवाराने आपल्या इतर व्यावसायिक मित्र, स्नेही यांच्या मदतीने पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत व्यवसायाला उभे केले.
नविन पिढीने व्यवसायात प्रगती, वाढ जलद व्हावी
नवीन पिढीला कोणता संदेश द्याल असे विचाराताच मितेश वैश्य म्हणतात, नवीन पिढीने आधुनिक तंत्रज्ञान, कम्यूनिकेशन साधनांना जग अत्यंत फास्ट झाले आहे. त्यांना घेऊन नव्या पिढीने झपाट्याने प्रगती करावी. स्वत:शी प्रामाणिक राहता राहता व्यवसायाशीही प्रमाणिक राहावे. काळाचे, वेळेचे मोल जाणत स्वत:सह संस्थेची प्रगती करावी. जग अत्यंत जलद झाले आहे. जगासोबत चालण्यासाठी नव्या पिढीने स्वत:ची गतीही जूळवून फास्ट व्हावे. वाढ, प्रगती हा कुठल्याही व्यवसायाचा आत्मा आहे. त्यासाठी अविरत, योग्य आणि सचोटीने महेनत घेण्याची तयारी तरुणाईने ठेवल्यास उद्योजक होण्याचे स्वप्न फार अवघड नाही.
जुन्या पिढीतील लोकांचे अनुभव अनमोल
व्यवसायात येण्यासाठी तरुणांना काय मार्गदर्शन कराल असे विचारताच शैलश वैश्य म्हणतात तुमच्या आधीच्या पिढ्यांनी खूप खस्ता खाऊन व्यवसाय, उद्योगाला स्थिरता दिलेली असते. त्यांच्या अनुभवाला शिरस्थानी मानून त्यांच्या वाटेवर चालण्याचे काम नवीन पिढीने करावे. कारण बुजुर्गाने अख्खी हयात घालवून ते अनुभव घेतलेले असतात. तावून सुलाखून निघालेल्या आपल्या पहिल्या पिढीतील हेच अनुभव नव्या पिढीला पथदर्शी ठरतात. नजीकच्या भविष्यात प्रॉडक्शन क्षेत्रात पर्दापण करण्यासह रिअल इस्टेटमध्ये विस्तार करण्याचा मानस असल्याचे शैलेश वैश्य व्यक्त करतात.
विदेश दौरे अन् व्यवसाय विस्तार
वयाच्या 27 व्या वर्षी शैलेश वैश्य यांनी 45 दिवस ऑस्टे्रेलियामधील सिडनी, मेलबर्न, गुलकोस्ट शहराचा बिझनेस दौरा केला. सिडनीमध्ये उद्योग-व्यवसायातील नवीन बदल, पद्धतीशीरपणा, यंत्राधिष्टीत तरीही व्यवस्थित सुरचना याचा त्यांनी अभ्यास केला. ऑस्ट्रेलियन देशात मनुष्यबळाचा कमीत कमी वापर करुन ऑनलाईनपद्धतीने सुनियोजीतपणे बिझनेस केला जातो याचा त्यांनी जवळून अभ्यास केला. तिकडच्या व्यवसायातील सर्वच गोष्टी भारतात कार्यान्वित करणे शक्य नव्हते. मात्र, अभ्यास करून त्यातील काही अनुभव आपल्या बिझनेसमध्ये आणण्याचा त्यांनी यशस्वी प्रयोग केला आणि त्यातून व्यवसायिक वृद्धी साधली. इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, दुबई या ठिकाणी भेटी देऊन शैलेश वैश्य यांनी अनुभव विश्व समृद्ध केले. देशाटन हे केवळ मौजमजा करण्यासाठी नसते तर त्यातून नवीन संस्कृती, नवीन तंत्रज्ञान, पद्धतीशीरपणा, व्यवस्थापन यांचा अभ्यासही होेतो तो आपल्या व्यापारात आणणे म्हणजेच खर्या अर्थाने पर्यटन होय असे शैलेश वैश्य नमूद करतात.
वडिलांची शिकवण व्यवसायासाठी प्रगतीकारक
वडिलांकडून कोणती मूल्य, शिकवण आपण शिकला असे विचारतातच शैलेश व मितेश म्हणतात, वडिलांनी कामामध्ये प्रामाणिकपणा आणि वेळचे भान राखले. व्यापाराची सिस्टीम निर्माण केली. त्यांनी आपल्या ब्रॅण्डशी लॉयलटी (एकनिष्टता) कधीही सोडली नाही. एका तत्त्वाशी, ब्रॅण्डशी ग्राहकांशी त्यांनी कायम एकनिष्टता जपली. पारदर्शी, स्वच्छ व्यवहाराने त्यांनी सदैव माणसे जोडून ठेवली. काळासोबत कसे चालावे, काळाशी कसे जुळवून घ्यावे हे सर्व गूण वडिलांकडून शिकलो, असे ते सांगतात. व्यापारात आवश्यक असलेले मनुष्यबळ जपून त्यांच्याही पगारात वेळोवेळी वाढ करुन माणूस टिकून ठेवणे हे तत्त्व वडिलांनी पाळले. त्यांच्यासोबत अनेक वर्षांपासून काम करणारे कर्मचारी आजही त्यांनी जपले. आमची दुसरी पिढी हेच तत्त्व पाळत आमचे कर्मचारी, स्टाफ, कायम ठेऊन त्यांच्याही प्रगतीचा विचार करत आपल्यासह त्यांचाही विकास, प्रगती कशी होईल हे बघत आहोत.